
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : डेरवण (ता. चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयामध्ये असणाऱ्या बालरोगतज्ज्ञ विभागाने शर्थीचे प्रयत्न करीत एका नवजात बाळाचे प्राण वाचवले.
एखादे बाळ जन्माला येताना ते पूर्णपणे निरोगी जन्माला येणे महत्त्वाचे असते. सातारा जिल्ह्यातील एका मातेच्या नवजात बाळाच्या बाबतीमध्ये मात्र तसे घडले नाही. तेथील कांबळे कुटुंबातील एक महिला वालावलकर रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दाखल झाली परंतु प्रसूतीपूर्वी केल्या जाणाऱ्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटाचे दोन पदर चिकटले दिसले आणि त्यामुळे पोटात हवा भरली आहे, असे निदर्शनास आले. याला Duodenal Atresia म्हणतात. याशिवाय प्रसूतीनंतर बाळाचे ऑपरेशन करणे अत्यंत गरजेचे होते. याची कल्पना बालरोग तज्ज्ञ डॉ. कुरणे आणि डॉ. पार्वती हळबे यांनी कांबळे कुटुंबीयांना दिली होती.
या बाळाची शस्त्रक्रिया अतिशय क्लिष्ट होती. नवजात बालकाचे वजन २.४४० किलो होते. बाळाला भूल देणेसुद्धा जिकिरीचे होते. बाळाच्या आजाराचे निदान लवकरात लवकर करण्यासाठी रॅडिलॉजिस्ट डॉ. नेताजी पाटील यांनी सी. टी. स्कॅन रिपोर्ट्स केले. बालरोग सर्जन डॉ. धनंजय वझे यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे असे ठरवले.
पुण्यामधील बालरोगतज्ज्ञ शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. वझे हे तातडीचे ऑपरेशन असल्यामुळे तातडीने पुण्याहून वालावलकर रुग्णालयात दाखल झाले व बाळाची शस्त्रक्रिया करून बाळाला जीवदान दिले. भूलतज्ज्ञ डॉ. गौरव बाविस्कर आणि सहकारी यांनी या दोन दिवसांच्या नवजात शिशूला भूल देऊन शत्रक्रिया सुखरूप पार पाडण्यात यश मिळवले.
ऑपरेशननंतर या बाळाची काळजी घेणे अत्यंत जिकिरीचे होते पण ती धुरा बालरोगतज्ज्ञ डॉ. अंकिता सुर्वे व डॉ. नताशा, पंक्ती, तनिषा, प्रतीक, स्वप्नील, यांनी उचलली. शस्त्रक्रिया उत्कृष्ट झालीच परंतु शस्त्रक्रियेनंतर बाळाची योग्य ती काळजी एनआयसीयू विभागातील सिस्टर वृषाली, सोनाली, श्रुतिका, जान्हवी, संपदा, नीलम, शीतल, ऐश्वर्या, प्राची, आकांक्षा, ईशा, साक्षी यांनी घेतली. बाळाचे ऑपरेशन व इतर पूर्ण खर्च महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत मोफत केला गेला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी