रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंदांचे जीवनचरित्र मार्गदर्शक - डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : जीवन यथार्थ करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद यांचे जीवनचरित्र मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, गोगटे-जोग
स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त आयोजित आंतरराज्य वक्तृत्व स्पर्धेचे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय गटातील विजेते आणि मध्ये बसलेले मान्यवर डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, डॉ. मकरंद साखळकर, हृषिकेश पटवर्धन, प्रा. सुनील गोसावी व परीक्षक


रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : जीवन यथार्थ करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद यांचे जीवनचरित्र मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांनी केले.

स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस) आणि अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आयोजित आंतरराज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा महाविद्यालयाच्या डॉ. केळकर सेमिनार हॉलमध्ये दिवसभर झाली. बक्षीस वितरणावेळी डॉ. कुलकर्णी यांनी स्वामींचे तत्त्वज्ञान विशद केले. ते म्हणाले, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि पावसच्या स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरी सांगून अनेकांना मार्ग दाखवला. अनेकदा या दोघांचेही एकत्रित संदर्भ दिले जातात. स्वामींना प्रतिज्ञानेश्वर म्हणूनही ओळखले जाते. पारतंत्र्याच्या काळात स्वामींवर महात्मा गांधी, लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. त्यांनी सत्याग्रहातही भाग घेतला, नंतर ते आध्यात्मिक गुरू बनले.

डॉ. कुलकर्णी यांनी स्वामी स्वरूपानंद यांचा जीवनपट छोट्या छोट्या गोष्टींतून उलगडून दाखवला. जीवन यथार्थ करण्यासाठी स्वामींचे जीवन मार्गदर्शक ठरते. महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. ज्ञानेश्वरी, गाथा वाचावी. सांसारिक जीवन जगताना परमार्थ करावा, असे स्वामींनी सांगितले. अनुभव व अनुभूती यात फरक आहे. नामस्मरण करत राहा, असा संदेश त्यांनी दिला. स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांचे दाखले देत प्रा. कुलकर्णी यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले.

यावेळी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, उपप्राचार्य सुनील गोसावी मंचावर उपस्थित होते. हृषिकेश पटवर्धन यांनी प्रास्ताविकामध्ये ही स्पर्धा दरवर्षी यशस्वीपणे आयोजित केली जात असल्याचे सांगून स्वामींच्या चरित्रावर चिंतन व्हावे हा स्पर्धेचा हेतू असल्याचे सांगितले. अभंग, श्लोक, साहित्य हे स्पर्धेपुरते नव्हे तर तुमच्या जीवनात थोडा तरी अंश येण्याकरिता उपयोगी ठरेल, असेही ते म्हणाले.

वरिष्ठ गटासाठी परीक्षक म्हणून जयंत फडके व कुमारशंकर गावडे यांनी तर कनिष्ठ गटासाठी सौ. अमृता नरसाळे व अॅड. सोनाली खेडेकर यांनी काम पाहिले. त्यांचा सन्मान करण्यात आला. दोन्ही परीक्षकांनी स्पर्धेचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्राचार्य डॉ. साखळकर यांनी विवेक, प्रामाणिक समाजमनाचा स्वामी संदेश महत्त्वाचा आहे आणि शैक्षणिक, वैचारिक उपक्रमांतून सुजाण नागरिक घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वामी स्वरूपानंद जन्मदिनानिमित्त आयोजित ही स्पर्धा २३ वर्षे सुरू आहे, त्याप्रमाणे याही पुढे चालू राहील, असे सांगितले.

बक्षीस वितरणावेळी प्रा. अन्वी कोळंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धाप्रमुख प्रा. मानसी गानू यांनी निकाल जाहीर केला. प्रा. कृष्णात खांडेकर यांनी परीक्षकांचा परिचय करून दिला. प्रा. अभिजित भिडे यांनी आभार मानले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा - वरिष्ठ महाविद्यालयीन गट- प्रथम- अपूर्व सामंत (पं. द्वारकाप्रसाद मिश्रा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आयटी, जबलपूर मध्य प्रदेश), द्वितीय- प्रथमेश चव्हाण (बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय, पुणे), तृतीय- मनस्वी नाटेकर (गोगटे- जोगळेकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ- निधी बडे (फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे), रोजीना साबळे (कला व विज्ञान महाविद्यालय, सावर्डे). कनिष्ठ महाविद्यालयीन गट- प्रथम- आदिती राजाध्यक्ष (राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सावंतवाडी), द्वितीय- शुभम नाटेकर (बी. के. बिर्ला कॉलेज, मुंबई), तृतीय- सृष्टी कुंभार (डॉ. बी. आर. सामंत ज्यु. कॉलेज, पावस), उत्तेजनार्थ- मैत्रेयी आपटे (सर परशुराम कॉलेज, पुणे), स्वानंदी शेंबवणेकर (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय). सांघिक फिरता चषक- वरिष्ठ गट- श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे कॉलेज, लांजा, उत्कृष्ट मार्गदर्शक- डॉ. महेश बावधनकर. कनिष्ठ गट- राणी पार्वतीबाई हायस्कूल व ज्यु. कॉलेज, सावंतवाडी, उत्कृष्ट मार्गदर्शक- महाश्वेता कुबल.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande