
अमरावती, 16 डिसेंबर, (हिं.स.)। अमरावती- यवतमाळ मार्गावर जलू गावाजवळ मध्यरात्री भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत नांदगाव खंडेश्वर येथील दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की कारचा समोरचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच लोणी टाकळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले व पुढील कारवाईसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. प्राथमिक तपासात वेगावर नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लोणी टाकळी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी