
कोल्हापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखूच्या हानिकारक परिणामांविषयी जनजागृती वाढविणे, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था व गावे वाढविणे, तसेच सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने कायदा (कोटपा) 2003 आणि इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने शासन निर्देशानुसार देशभरात तंबाखूमुक्त युवा अभियान 3.0 हे 60 दिवसीय अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत युवक-युवतींमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना व व्यापक जनजागृती करण्यात आली.
जिल्ह्यात दि. 9 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाची सुरुवात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. उद्घाटनप्रसंगी उपसंचालक आरोग्य सेवा दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे उपस्थित होते.
जिल्ह्यातील सामान्य, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे, तसेच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे हे अभियान उत्साहात राबविण्यात आले. याअंतर्गत तंबाखूमुक्तीविषयी शपथ, ग्राम–तालुका–जिल्हास्तरावर युवकांच्या सहभागाने जनजागृती रॅली, तसेच महाविद्यालयांमध्ये चित्रकला, पोस्टर, रांगोळी, निबंध स्पर्धा आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून रील्स तयार करण्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले. तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी दसरा चौक, बसस्टॉप, मध्यवर्ती बसस्थानक, कावळा नाका परिसर तसेच विविध महाविद्यालयांमध्ये पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात आले. शाळा व महाविद्यालयांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर धाडी टाकून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली. याशिवाय जिल्हा शल्यचिकित्सकांची रेडिओवरील मुलाखतही प्रक्षेपित करण्यात आली.
ग्रामपंचायत स्तरावर समुदाय, उपकेंद्रे, आरोग्य अधिकारी व आशा स्वयंसेविकांच्या मदतीने गावे तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रबोधन करण्यात आले. तंबाखूमुक्त शाळा उपक्रमांतर्गत शिक्षण विभागाच्या सहकार्याने मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळांमध्ये जिल्हा सल्लागार डॉ. विक्रम आरळेकर, दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पाटील, मानसशास्त्रज्ञ चारुशीला कणसे व सामाजिक कार्यकर्ता क्रांती शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
या वर्षी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात 84 शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या असून उर्वरित शाळांसाठी दुसऱ्या सत्रात प्रयत्न सुरू आहेत. तसेच एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत 650 नागरिकांनी तंबाखू व्यसन सोडले आहे. तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष सातत्याने कार्यरत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar