
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : कुणबी समाजाचा विकास झाला, तरच कोकणाचा सर्वांगीण विकास क्य आहे, असे प्रतिपादन गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी केले.
देवरूख येथील कुणबी महोत्सवात ते बोलत होते. ते म्हणाले, कोकणात जवळपास ७० टक्के कुणबी समाज आहे. हा ओबीसींचा ‘मोठा भाऊ’ जर विकासापासून वंचित राहिला, तर कोकणचा विकास कधीच होऊ शकणार नाही. त्यामुळे कोकणाचा कायापालट करायचा असेल, तर कुणबी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. आतापर्यंत कुणबी समाजाला गृहीत धरण्याचे काम झाले आहे.
कुणबी महोत्सव शहरात न भरवता ग्रामीण भागात भरवण्यामागचा उद्देश स्पष्ट करताना खंडागळे म्हणाले की, जर आपल्याला गावांचा विकास करायचा असेल, तर अशा महोत्सवांतून होणारे प्रबोधन थेट गावकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. हीच विकासाची खरी सुरुवात आहे.
श्री. खंडागळे यांनी शासनाच्या धोरणांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले, गेली १७-१८ वर्षे मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे, तो पूर्ण होत नाही. असे असतानाच आता पर्यटनाच्या नावाखाली ‘कोकण समृद्धी महामार्गा’चा घाट घातला जात आहे. ज्याची गरज आहे ते दिले जात नाही आणि ज्याची गरज नाही ते प्रकल्प लादले जात आहेत. जमिनी विकून मुंबईकडे धाव घेणाऱ्या तरुणांना त्यांनी भविष्यातील धोक्याची जाणीव करून दिली. बाहेरील लोक कोकणात जमिनी घेत आहेत आणि आपण मात्र विस्थापित होत आहोत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या मानसिकतेवर बोट ठेवत श्री. खंडागळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शासकीय कार्यालयात अधिकारी भेटत नाहीत म्हणून आपण ओरडतो. मात्र जेव्हा आपल्याच गावात तालुका कृषी अधिकारी स्वतःहून योजना सांगायला येतात, तेव्हा गावकरी त्याकडे पाठ फिरवतात. अधिकारी तासनतास वाट पाहतात, पण लोक येत नाहीत, ही मोठी शोकांतिका आहे. ३०-४० टक्के अनुदानाच्या योजना दारात आल्यावर त्याचा लाभ घेतला नाही, तर प्रगती होणार नाही. शेती आणि ग्रामविकासाकडे गांभीर्याने पाहावे. आपल्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना समजून घ्या. ‘खेकडा वृत्ती’ सोडून जोपर्यंत आपण जागरूक होणार नाही, तोपर्यंत कोकणचा आणि समाजाचा खरा विकास होणार नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी