
मुंबई, 16 डिसेंबर (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक आज समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात पार पडली.
निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केले असून महिन्याच्या दर मंगळवारी आढावा बैठक घेत नवाब मलिक यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
आज पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी आढावा बैठक घेत आपला इरादा स्पष्ट केला असून आज या बैठकीत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. मुंबई मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप - शिवसेनेसोबत युती झाली तर ५० जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असणार आहे. यासंदर्भाचा अहवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे उद्या सूपुर्द केला जाणार आहे अशीही माहिती माध्यमांना देण्यात आली.
आजच्या बैठकीला मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, आमदार सना मलिक-शेख, माजी आमदार झिशान सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश सरचिटणीस संजय तटकरे, मुंबई सरचिटणीस राजू घुगे, निमंत्रित सदस्य दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, अजय विचारे, अर्शद अमीर, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव, व्यंकटेश मानव आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर