
सोलापूर, 16 डिसेंबर (हिं.स.)। सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक-टंकलेखक (गट-क) एकूण ७२ पदाकरीता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिक (युध्द काळात किंवा युध्द नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यामुळे नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंती क्रमाने) पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांपैकी ०३ पदे ही अपंग संवर्गातून किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारामधून दिव्यांगत्याच्या प्रकारांनुसार कर्तव्ये व जबाबदारीचा विचार करुन गुणवत्ता व उपलब्धतेनुसार भरण्यात येणार आहेत.
सदर भरती प्रक्रिया टिसीएस-आयओएन यांचे मार्फत होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. पात्र उमेदवारांना वेब-बेस्ड ऑन लाईन अर्जwww.mahasainik.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर ३१ डिसेंबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड