
ठाणे, 16 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याण या त्रिसूत्रीच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वंकष व शास्त्रीय कृती आराखडा राबविण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत दिल्या. मा. सर्वोच्च न्यायालयातील Suo Motu Writ Petition (Civil) No. 5 of 2025 च्या पार्श्वभूमीवर आज आयुक्त दालनात बैठक पार पडली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मनिष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी क्षमा शिरोडकर आदी उपस्थित होते.
मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 7 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी पाच निर्देशित संस्थांमार्फत स्वतंत्र निवारे (Shelters) व केनेल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस डेपो व रेल्वे स्थानके यांसारख्या संवेदनशील व संस्थात्मक परिसरांतून पकडलेले कुत्रे त्या-त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येणार नाहीत, तर त्यांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत दिल्या.
ठाणे महानगरपालिकेमार्फत प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम, 2023 नुसार पकड- नसबंदी- लसीकरण- पुनर्स्थापना (Animal Birth Control (Dogs) Rules, 2023 नुसार Capture–Sterilise–Vaccinate–Release (CSVR)) कार्यक्रम अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पद्धतीने राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करूनच त्यांचे व्यवस्थापन करण्यात येईल. आजारी, जखमी, रेबीजग्रस्त व संशयित रेबीज बाधित कुत्र्यांवर नियमानुसार स्वतंत्र कार्यवाही केली जाणार आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने नसबंदी केंद्रांची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील भटक्या कुत्र्यांची अंदाजित संख्या शास्त्रीय पद्धतीने निश्चित करून त्यानुसार केनेल व शेल्टर क्षमतेचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वाहने, उपकरणे तसेच पशुवैद्यकीय सुविधा वाढविण्यात येतील. तसेच रॅबीज प्रतिबंधक लस व इम्युनोग्लोब्युलिनची उपलब्धता सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सुनिश्चित करण्यात येणार असल्याचे उपायुक्त मनिष जोशी यांनी बैठकीत सांगितले.
नागरिकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने भटक्या कुत्र्यांना खाद्य (Feeding Zones) देण्याचा परिसर निश्चित करण्यात येणार असून, यासाठी शहरात जनजागृती केली जाणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देत, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न मानवीय, शास्त्रीय व कायदेशीर पद्धतीने सोडविण्यास ठाणे महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी या उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर