
ठाणे, 16 डिसेंबर (हिं.स.)। सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम या विषयाला अनुसरून शाश्वत शेती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिकला पर्याय, हरित ऊर्जा, उद्योन्मुख तंत्रज्ञान, मनोरंजक गणितीय मॉडेलिंग, आरोग्य आणि स्वच्छता, जलसंवर्धन आणि व्यवस्थापन यावर आधारित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर करुन विद्यार्थ्यांनी उपस्थितांकडून कौतुकाची थाप मिळविली.
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग ठाणे आयोजित 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दिनांक 16 डिसेंबर 2025) उत्साहात पार पडले. हे प्रदर्शन ठाणे मनपा शाळा क्रमांक 115 कळवा येथे आयोजित करण्यात आले आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व महानगरपालिका शाळा, गट स्तरावर निवड झालेल्या खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा अशा एकूण 127 शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केलेले आहेत. यावर्षी एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या संदर्भीय निर्देशांन्वये विज्ञान प्रदर्शनाचा विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टेम हा मुख्य विषय निश्चित करण्यात आला होता.
विज्ञान प्रदर्शनास शिक्षण उपायुक्त सचिन सांगळे, प्रमुख अतिथी म्हणून बी. एन. बांदोडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. प्रल्हाद वाघ, गट अधिकारी संगिता वामणे, यु. आर. सी. प्रमुख रविंद्र पाटील व मुश्ताक पठाण, लेखाधिकारी चांगदेव वीर तसेच सर्व गटप्रमुख व मुख्याध्यापक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे परीक्षण करण्यासाठी विद्या कदम, प्रा. हेमराज बराटे व सुनिल जाधव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
प्रमुख अतिथी डॉ. प्रल्हाद वाघ यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना अधिकाधिक चिकीत्सक विचार करण्यासाठी प्रेरित केले. तसेच शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे साहेब यांनी दैनंदिन जीवनातील विज्ञानाची व्यापकता, मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर केलेला ‘अश्मयुग ते आधुनिक युग’ असा प्रवास व सध्याच्या टेक्नॉलॉजी सारख्या क्षेत्रात भारताची निर्णायक वाटचाल अशा विविध विषयावर विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले. सदर प्रदर्शन सर्वांना पाहण्यासाठी 17 डिसेंबरपर्यंत रोजी खुले असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर