
ठाणे, 16 डिसेंबर (हिं.स.)। चालू वर्षात ठाणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2025-26 येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. ही मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होताच महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे यांनी महापालिका निवडणूकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला.
या बैठकीस निवडणूकविभागाचे उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, मधुकर बोडके, मिताली संचेती, सचिन सांगळे, दिपक झिंजाड, अनघा कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह सर्व उपनगर अभियंता यांच्या विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 33 प्रभाग असून एकूण मतदारांची संख्या 16 लाख 49 हजार 867 इतकी आहे. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या 8 लाख 63 हजार 878 इतकी तर महिला मतदारांची संख्या 7 लाख 85 हजार 830 इतकी असून इतर मतदारांची संख्या 159 इतकी आहे. 33 प्रभागात एकूण 1942 इतकी मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. तर प्रत्यक्ष निवडणूकीच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मिळून एकूण 9710 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3, शिपाई व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. ठाणे शहरात 1942 मतदान केंद्रासाठी 9 हजार 710 कर्मचारी वर्ग आवश्यक असून या व्यतिरिक्त 20 टक्के राखीव कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.
या बैठकीत सार्वत्रिक निवडणूकीच्या पूर्व तयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला. मतदान केंद्र निश्चिती व तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय निश्चिती व तयारी, वाहन उपलब्धतता व सनियंत्रण, सी.सी.टिव्ही व वेबकास्टिंग सुविधा, विद्युत व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्था, मतदान केंद्रांचे नियोजन, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था, तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये, मतदान केंद्रे, मतमोजणी केंद्रे, सुरक्षा कक्ष (स्ट्राँग रुम) मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र आदी ठिकाणी सी.सी.टिव्ही सुविधा तसेच अतिसंवेदनशील मतदान केंद्र तसेच अति संवेदनशील भागातील निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये इत्यादी ठिकाणी आवश्यकतेनुसार वेब कास्टिंग सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
तसेच मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास होवू नये यासाठी मतदान केंद्र ही तळमजल्यावर तयार करण्यात येत आहे. तसेच मतदान केंद्रावर येणाऱ्या दिव्यांग नागरिकांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध कराव्यात अशाही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून निवडणूकीसाठी सर्व अधिकारी कर्मचारी यांना नेमून दिलेल्या कामाची जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडावी. निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य असून आपल्या कर्तव्यात कसूर न करता निवडणूक प्रक्रिया उत्साहात पार पाडावी असे नमूद करीत अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी सर्व अधिकारी कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर