
रत्नागिरी, 16 डिसेंबर, (हिं. स.) : कोकणातील जलसंधारण प्रकल्पांसाठी विशेष पॅकेज देण्याची आमदार शेखर निकम यांनी नुकतीच नागपूर येथील विधिमंडळाच्या अधिवेशनात केली.
अधिवेशन संपवून श्री. निकम चिपळूणला आले असता त्यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, कोकणातील लघुपाटबंधारे आणि लघु जलसंधारण प्रकल्प कोकणासाठी उपयुक्त आणि शाश्वत पर्याय आहेत. मात्र निधीअभावी अनेक मंजूर प्रकल्प रखडले आहेत. या प्रकल्पांचा शेतकरी आणि ग्रामीण भागाला अपेक्षित लाभ मिळत नाही. त्यामुळे या प्रकल्पाचा निधी थांबवू नका, निधी थांबला तर कोकणचा श्वास थांबेल. अशा कोकणाच्या जलसंधारणासाठी विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी हिवाळी अधिवेशनात केली आहे.
अधिवेशनादरम्यान कोकणातील जलसंधारण या विषयावर सभागृहात चर्चा झाली. आमदार शेखर निकम यांनी कोकणाच्या भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा विचार करून आपली भूमिका मांडली.
राज्याचा विचार करता लघुपाट बंधाऱ्यांच्या बहुतांशी कोकण विभागात आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण झाले तर कोकण निश्चितच सुजलाम् सुफलाम् होऊ शकतो, असेही मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले. कोकणासाठी स्वतंत्र विशेष जलसंधारण पॅकेज देण्याचा विचार शासन स्तरावर करण्यात यावा, अशी मागणी यावेळी आमदार निकम यांनी केली. निधीअभावी मंजूर प्रकल्प रद्द न करता त्यांना आवश्यक आर्थिक पाठबळ देऊन वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचेही सभागृहात सांगितल्याचे श्री. निकम म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी