
अकोला, 20 डिसेंबर (हिं.स.)। कोणीही मोठे नेते सोबत किंवा विरोधात आले तरी भाजपवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही , दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरीही भाजपला फरक पडणार नाही, असे ठाम वक्तव्य महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
अकोल्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित बैठकीनिमित्त बावनकुळे अकोला दौऱ्यावर आले होते,यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.विधानसभेच्या निवडणुकीत भाजपविरोधात इंडिया आघाडीचे तब्बल वीस पक्ष एकत्र आले होते, तरीही भाजप घाबरला नाही. उलट, येत्या निवडणुकांत भाजप ५१ टक्क्यांहून अधिक जागा जिंकेल, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात युतीबाबत बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहेत,तसेच अजित पवार यांनीही चर्चा करण्याची तयारी दर्शवली, तर भाजप त्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस ( अ. प ) ने मुंबई महापालिकेची जबाबदारी दिली आहे यावर आमची कोणतीही नाराजी नसल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथील आमदाराने मतदारांना कोंडून ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीत पराभव दिसू लागला की विरोधक असे आरोप करतात. मात्र, जर खरोखरच मतदारांना कोंडून ठेवण्यात आले असेल, तर याची चौकशी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी करावी, असेही त्यांनी सांगितले.अकोला महापालिकेत भाजपला शय देण्यासाठी भाजपचे नाराज आजी - माजी नगरसेवक यांनी तयार केलेल्या तिसरी आघाडी सोबत चर्चा करून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न लवकरच करणार असल्याचेही ते म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे