
एकूण 21 जिल्ह्यांत 100 टक्के तपासणीचे उद्दिष्ट
अकोला, 20 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात सिकलसेल आजाराचे दुरीकरण करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ठरविण्यात आला आहे. त्यानुसार विदर्भासह सिकलसेल आजाराचा प्रादुर्भाव असलेल्या राज्यातील 21 जिल्ह्यांत विशेष सिकलसेल दुरीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेचे नियोजन 18 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत करून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येणार असून, 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 दरम्यान प्रत्यक्ष मोहीम राबविली जाणार आहे. या काळात नागरिकांची 100 टक्के तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यात जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, उपसंचालक आरोग्यसेवा डॉ. सुशील वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आरती कुलवाल यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेचे सखोल नियोजन करण्यात आले आहे.
सिकलसेल आजार काय आहे?
सिकलसेल हा अनुवांशिक रक्तविकार असून यात हिमोग्लोबिन ‘एस’ तयार होते. त्यामुळे लाल रक्तपेशी गोल न राहता चंद्रकोरीसारख्या (सिकल) होतात. अशा पेशी रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण करतात, ऑक्सिजनपुरवठा कमी होतो व वेदनादायक प्रसंग, अवयवांचे नुकसान यांसारख्या गुंतागुंती निर्माण होतात.
लक्षणे व गुंतागुंत
या आजारात तीव्र वेदनांचे झटके (सिकलसेल क्रायसिस), अॅनिमिया, वारंवार होणारे संक्रमण, हात-पायांना सूज, मुलांमध्ये वाढीचा विलंब, दृष्टी समस्या आदी लक्षणे दिसतात. योग्य उपचार न झाल्यास स्ट्रोक, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे व हृदयाचे नुकसान होऊ शकते.
घरोघरी जनजागृती व मोफत तपासणी
या मोहिमेत आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी घरोघरी जाऊन जनजागृती करतील. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा, जिल्हा व महिला रुग्णालयांमध्ये सिकलसेल तपासणी केली जाणार आहे. बाधित रुग्णांना तात्काळ उपचार सुरू केले जातील. सध्या उपचार घेत असलेले तसेच नव्याने निदान होणारे सर्व रुग्ण उपचाराच्या कक्षेत येतील.
यासोबतच विवाहपूर्व समुपदेशन, सिकलसेल रुग्णांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे