
लातूर, 20 डिसेंबर (हिं.स.)। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 'साहेबांचा ताफा' फक्त व्हीआयपी फिरण्यासाठी नसून तो जनतेच्या रक्षणासाठीही आहे, याची प्रचिती दिली आहे. एका भीषण अपघातातील जखमीला वेळेवर मदत मिळावी म्हणून मंत्र्यांनी स्वतःचा प्रोटोकॉल बाजूला ठेवून माणुसकी जपली.
बाबासाहेब पाटील हे उजना येथील सिद्धी शुगर कारखान्याचा दौरा आटपून शिरूर ताजबंदकडे निघाले होते. अहमदपूर शहराजवळ येताच रस्त्यावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेली त्यांना दिसली. गर्दी असूनही मदत मिळण्यास उशीर होत असल्याचे पाहून मंत्र्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपला ताफा थांबवण्याचे आदेश दिले.
स्वतःच्या गाडीत बसवून गाठले रुग्णालय
रुग्णवाहिकेची वाट न पाहता, मंत्री महोदयांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या जखमी व्यक्तीला उचलले आणि स्वतःच्या गाडीत बसवले. स्वतः सोबत राहून त्यांनी जखमीला ग्रामीण रुग्णालय, अहमदपूर येथे दाखल केले.
डॉक्टरांना तातडीच्या सूचना
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. रुग्ण गंभीर आहे, सर्व यंत्रणा तयार ठेवा आणि तातडीने उपचार सुरू करा, अशा कडक सूचना त्यांनी दिल्या. मंत्र्यांच्या या तत्परतेमुळे जखमी व्यक्तीवर वेळेत उपचार सुरू झाले असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis