
कोल्हापूर, 20 डिसेंबर, (हिं.स.)। पुणे बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची (ता हातकणंगले ) येथील दर्गाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत मलिग्रे ता. आजरा येथील तरुण डॉक्टर जागीच ठार झाला. डॉ. प्रसाद दिनकर बुगडे (वय 29) असे त्याचे नाव असून आपल्याआईला डोळ्यावर औषधोपचार करण्यासाठी गावाहून बोलावून घेतले होते. आई जवळ पोहचण्या आधीच त्याच्यावर काळाने झडप घातली. हा अपघात आज शनिवारी सकाळी 9 वाजण्यासुमार घडला.
पोलिसातून घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहीती अशी कि मयत तरुणाचे नाव डॉ. प्रसाद दिनकर बुगडे (वय 29 रा मलिग्रे ता. आजरा जि. कोल्हापुर ) आहे. तो आज सकाळी मिरजेहून मोटर सायकलने आला होता. तर मुलाने फोन करून सांगीतल्यानंतर त्याची आई मलिग्रे गावाहून येऊन कोल्हापूर गांधीनगर दरम्यानच्या महामार्गवर तावडे हॉटेल परिसरात येऊन त्याची वाट पहात थांबली होती. डॉ. प्रसाद तावडे हॉटेल येथून आईला घेऊन मोटर सायकल वरून कणेरी मठ येथील सिद्धगीरी हॉस्पिटल येथे जाणार होता. तो शिरोली येथून पंचगंगा नदी जवळील दर्ग्या जवळ आला असता आई पर्यंत पोहचण्यास अवधे १ कि.मी.अंतर राहीले असताना त्याच्या (क्र. एम एच 09 जी व्ही 8059 ) मोटर सायकलला अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिली. त्यात तो जागीच ठार झाला.
प्रसाद याला तिन बहीणी असून त्याच्या वडीलांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. प्रसाद हा अभ्यासात हुशार होता. त्याचे दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण गावातच झाले तर 12 वीचे शिक्षण गडिहग्लज तर वैद्यकीय शिक्षण कवठेमहांकाळ येथे पुर्ण केले होते. तो आपल्या डॉक्टर बहीणीकडे मिरज येथे राहत होता बहिणीनेच त्याचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले होते. प्रसाद हा कुटुंबात सर्वात लहान असला तरी त्याच्या कुटुंबीयांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. या अपघाताची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar