हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण पुनर्निर्माणासाठी निधी मंजूर करण्याची मागणी
नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)। दशम गुरु श्री गुरु गोबिंदसिंहजी यांच्या पावन सानिध्याने पवित्र झालेली गुरुंची नगरी तसेच गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेड हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे धार्मिक, सांस्कृतिक
हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण पुनर्निर्माणासाठी निधी मंजूर करण्याची मागणी


नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)। दशम गुरु श्री गुरु गोबिंदसिंहजी यांच्या पावन सानिध्याने पवित्र झालेली गुरुंची नगरी तसेच गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले तख्त सचखंड श्री हजूर साहिब नांदेड हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभव मानले जाते. दरवर्षी देश-विदेशातून लाखो भाविक व पर्यटक या पवित्र स्थळी दर्शनासाठी येतात. या पार्श्वभूमीवर हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण पुनर्निर्माणासाठी व जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत केली आहे.

या संदर्भात राज्यसभेत अतारांकित प्रश्न क्रमांक १५६० द्वारे डॉ. गोपछडे यांनी नांदेड रेल्वे स्थानकाच्या पुनर्निर्माणाचा विषय भारत सरकारच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यावर उत्तर देतांना रेल्वे मंत्रालयाने स्थानकाच्या पुनर्निर्माणासाठी मास्टर प्लॅनिंग प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे स्पष्ट केले असून ही प्रक्रिया सध्या प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे. या निर्णयामुळे भाविक व प्रवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांत स्थानक परिसरात कॅरेज वॉटरिंग सिस्टिमची उभारणी तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरील प्रतीक्षालयाच्या सुधारणा पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी वाढती प्रवासी संख्या, आंतरराज्य व आंतरराष्ट्रीय भाविकांचे सातत्याने होणारे आगमन तसेच नांदेड शहराचा भविष्यातील विस्तार लक्षात घेता, स्थानकाचे आधुनिक, नियोजित व जागतिक दर्जाचे पुनर्निर्माण करणे अत्यावश्यक बनले आहे.

त्यामुळे हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकाच्या सर्वांगीण पुनर्निर्माणासाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून आगामी टप्प्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खा . डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande