
जळगाव, 20 डिसेंबर (हिं.स.)जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी आपल्या कुटुंबाराह वास्तव्यास असून, साधारण सहा महिन्यांपूर्वीपासून ते २० राष्टेंबर २०२५ या कालावधीत मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील रहिवासी मुकेश साकेत याने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिस तपासानुसार, संशयित आरोपी मुकेश साकेत हा पीडितेच्या घरात घुसून तिव्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. केवळ अत्याचार करून न थांबता, ही बाब कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याने पीडितेला भीतीखाली ठेवले होते. या दहशतीमुळे पीडिता काही काळ गप्प राहिली. मात्र अखेर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ६४(१), ६४(२) (m), ६५(१), ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो) मधील कलम ४, ६ व १२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर