
रायगड, 20 डिसेंबर (हिं.स.)। कुणबी समाजोन्नती संघ, शाखा मुंबई (तालुका म्हसळा) तसेच मुंबई संलग्न महिला मंडळ, युवक मंडळ व क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुणबी समाजोन्नती संघ मुंबई – २०२६ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबीर व विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत बोरीवली (पूर्व), मुंबई येथील श्रीकृष्ण सभागृहात संपन्न होणार आहे.
समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन मिळावे, तसेच त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात संघाच्या २०२६ वर्षाच्या दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार असून, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे.
विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबिरात प्राध्यापक सुरज जाधव हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात करिअर निवड, अभ्यासपद्धती अधिक प्रभावी कशा कराव्यात, परीक्षा व अभ्यासातील तणाव आणि दडपण कसे कमी करावे, अभ्यासातील एकाग्रता व नियोजनाचे महत्त्व, विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय कसे घ्यावेत, तसेच समूहचर्चा व प्रश्नोत्तर सत्र अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञान, स्पर्धा परीक्षा तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांतील संधींबाबत उपयुक्त माहिती मिळून करिअरच्या दृष्टीने योग्य दिशा मिळेल, असे संघाचे अध्यक्ष श्री. महेंद्र टिंगरे व सचिव श्री. राजू धाडवे यांनी सांगितले.या कार्यक्रमास म्हसळा तालुक्यातील सर्व कुणबी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संघाचे सहसचिव श्री. अनिल काप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके