
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी शहरातील विश्वनगर परिसरातील नगरपालिका वसाहतीतील अमोल सावंत यांच्या आंब्याचे बागेत एका बिबट्याने एका बैलावर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. थिबा पॅलेस, विश्वनगर, आंबेशेत परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे व मॉर्निंग वॉकसाठी एकटे-दुकटे जाऊ नये, असे सतर्कतेचे आवाहन रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, बिबट्या हा वन्य प्राणी सामान्यतः माणसांना टाळतो. पण काही वेळा अन्नाच्या शोधात किंवा घाबरून तो मानवी वस्तीत येतो. अशा वेळी आपण सर्वांनी एकत्रितपणे काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो.रात्री घराबाहेर छोट्या मुलांना एकटे सोडू नये. विशेषतः ६-७ वाजल्यानंतर लहान मुलांना एकटे खेळायला किंवा फिरायला पाठवू नका. कचरा आणि अन्नाचे तुकडे घराबाहेर ठेवू नयेत. कुत्र्याचे अन्न, कोंबडीचे अंडी, मांस, मासे, उरलेले अन्न इत्यादी उघड्यावर ठेवू नये. यामुळे बिबट्याला आकर्षण होऊ शकते.
कुत्र्यांना रात्री बांधून ठेवावे. रात्री कुत्र्यांना घराबाहेर मोकळे सोडू नये. बिबट्या प्रथम कुत्र्यांवरच हल्ला करतो. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पिल्लू, कोंबड्या ठेवताना सावध राहावे. रात्रीच्या वेळी त्यांना आत घ्यावे किंवा मजबूत जाळी लावलेली पिंजरा वापरावा. बिबट्या दिसल्यास घाबरू नये, पण जवळ जाऊ नये. शांतपणे मागे सरकावे. डोळ्यांत डोळे घालू नयेत. हात वर करून मोठा दिसण्याचा प्रयत्न करावा. हळूहळू मागे फिरून सुरक्षित ठिकाणी जावे. बिबट्याने हल्ला केल्यास पोलिसांशी १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा.बिबट्याला मारण्याचा प्रयत्न करू नये. तो घाबरला तर अधिक धोकादायक होऊ शकतो. वन विभागाला बोलावणे हाच सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. सुरक्षित राहावे, एकमेकांना सावध करावे, असे सतर्कतेचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी