मनपा निवडणूक नियुक्ती प्रकरणात ‌’भाजप बॅकफूटवर’
जळगाव, 20 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रदेश भाजपाने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती करतांना शहराचे आमदार असलेल्या सुरेश भोळेंचे काय? असा प्रश्न उपस्थित होताच भारतीय
मनपा निवडणूक नियुक्ती प्रकरणात ‌’भाजप बॅकफूटवर’


जळगाव, 20 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रदेश भाजपाने चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती करतांना शहराचे आमदार असलेल्या सुरेश भोळेंचे काय? असा प्रश्न उपस्थित होताच भारतीय जनता पक्ष चांगलाच दचकला. तत्काळ सायंकाळी आमदार सुरेश भोळे यांच्या निवडणूक प्रमुख पदाचे पत्र जारी करीत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रदेशकडून झाला.

भारतीय जनता पक्ष 365 दिवस निवडणुकीच्या मूडमध्ये असतो. वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना व्यस्त ठेवत असतो. अशाच कार्यक्रमांमधून भाजपाचे नेतृत्व तयार होते. त्यामुळे भाजपा हा ‌‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणून ओळखला जातो. यासोबतच भाजपाची गत दशकातील ओळख म्हणजे ‌‘धक्कातंत्र’. राष्ट्रीय अध्यक्षापासून ते जिल्हाध्यक्षपदापर्यंतच्या सर्वच नियुक्त्यांमध्ये भाजपकडून या तंत्राचा सर्वाधिक वापर केला जातो. तसेच निवडणुकांमध्ये देखील नेतृत्व सोपविण्यातही या धक्कातंत्राचा वापर करण्यात आला आहे.जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांचा शब्द प्रमाण मानला जातो. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील अशी दाट शक्यता होती. मात्र संकटमोचक असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांचा राज्यातील आवाका लक्षात घेता त्यांना जिल्ह्यात अडकवून ठेवणे हे पक्षाला अपेक्षित नव्हते. त्यामुळे धक्कातंत्राचा वापर करीत जळगाव जिल्ह्याचे प्रभारी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची नियुक्ती करण्यात आली. यासोबतच पूर्व विभाग निवडणूक प्रमुख म्हणून नंदकिशोर महाजन, पश्चिम विभाग निवडणूक प्रमुख आमदार मंगेश चव्हाण आणि जळगावचे निवडणूक प्रमुख म्हणून आमदार सुरेश भोळे यांची नियुक्ती झाली. या सर्व नियुक्त्या 5 नोव्हेंबर रोजीच जाहीर झाल्या होत्या.पालिका निवडणुकांनंतर महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी भाजपाने 15 डिसेंबर रोजी ईच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया पूर्ण केली. मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 17 डिसेंबर रोजी जळगाव मनपा निवडणूक प्रभारी म्हणून चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

साधारणत: निवडणुक जाहीर होण्या आधीच प्रभारींची नियुक्ती केली जाते. मात्र याठिकाणी भाजपाने मुलाखत प्रक्रियेनंतर प्रभारींची नियुक्ती केली.आमदार मंगेश चव्हाण हे भाजपाती आक्रमक नेतृत्व आहे. नुकत्याच जिल्हा बँक, दूध संघ या सर्व निवडणुकांमध्ये विरोधकांना अंगावर घेण्याचे कसब त्यांना चांगलेच ज्ञात आहे. या कलागुणांमुळेच जिल्ह्यातील पाचोरा या गाजलेल्या पालिकेचे नेतृत्वही त्यांच्याचकडे सोपविण्यात आले होते. मात्र विरोधकांना 100 टक्के थोपविण्यासाठी भाजपने जळगाव मनपासाठी प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करताच भाजपात अंतर्गत खळबळ उडाली.जर चव्हाण प्रभारी राहतील तर मग आमदार सुरेश भोळेंचे काय? असा प्रश्न उपस्थित राहिला. जळगाव शहराने सलग तिसऱ्यांदा आ. भोळेंना नेतृत्व करण्याची संधी दिली. तसेच शहरात लेवा समाज देखील दुसऱ्या क्रमांकाचा मतदार आहे. त्यातच आमदार भोळेंचेही भाजपात अनेक समर्थक आहेत. समाज आणि समर्थक दुखावले जात असल्याचे लक्षात येताच भाजपने ‌‘बॅकफूटवर’ येत 5 नोव्हेंबर रोजी केलेल्या नियुक्तीचे पत्र 17 डिसेंबरला जारी करून चूक दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande