रायगडच्या गाणी–कोंढे येथे अगरबत्ती निर्मिती प्रशिक्षण
रायगड, 20 डिसेंबर (हिं.स.)श्रीवर्धन | तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी–कोंढे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिलांसाठी विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना अगरबत्ती निर्मिती या विषयाव
महिला सक्षमीकरणाचा आदर्श उपक्रम; गाणी–कोंढे येथे अगरबत्ती निर्मिती प्रशिक्षण


रायगड, 20 डिसेंबर (हिं.स.)श्रीवर्धन | तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गाणी–कोंढे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महिलांसाठी विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांना अगरबत्ती निर्मिती या विषयावर सविस्तर तांत्रिक व व्यावसायिक मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

या प्रशिक्षण कार्यक्रमास ग्रुप ग्रामपंचायत गाणी–कोंढेचे सरपंच आदित्य कासरुंग, ग्रामपंचायत अधिकारी अभिजीत माने, कृषी विस्ताराधिकारी राधा कराळे, उमेद (MSRLM) चे तालुका व्यवस्थापक किशोर गोरटे, तसेच तज्ज्ञ प्रशिक्षक शिल्पा पाटील व विप्राली पुसाळकर उपस्थित होते.

प्रशिक्षक शिल्पा पाटील व विप्राली पुसाळकर यांनी महिलांना अगरबत्ती निर्मितीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखवली. अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, सुगंधी द्रव्यांचे योग्य प्रमाण, उत्पादनाची गुणवत्ता कशी राखावी, आकर्षक पॅकिंगचे महत्त्व तसेच तयार मालाची बाजारपेठेत विक्री कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कमी भांडवलात घरच्या घरी हा उद्योग सुरू करून महिलांना स्थिर उत्पन्नाचा स्रोत कसा निर्माण करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला.यावेळी सरपंच आदित्य कासरुंग यांनी सांगितले की, “महिलांनी केवळ घरगुती जबाबदाऱ्यांपुरते मर्यादित न राहता कौशल्याधारित उद्योगांकडे वळावे. ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.” कृषी विस्ताराधिकारी राधा कराळे यांनी महिलांना विविध शासकीय योजना व बचतगटांच्या माध्यमातून मिळणाऱ्या आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या प्रशिक्षण शिबिराला गाणी–कोंढे परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला. ग्रामपंचायत प्रशासनाने कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्धरीत्या केले होते. या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande