
नांदेड, 20 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी आगामी नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी खा. अशोक चव्हाण तर प्रभारी पदाची जबाबदारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपवली आहे.
भाजपच्या प्रदेश कार्यालयाकडून या निर्णयाबाबतची पत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांनी मागील तीन महिन्यांपासून नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला प्रारंभ केला असून, संभाव्य उमेदवारांची सर्वेक्षणे, इच्छुकांच्या मुलाखती, समन्वय समितीचे गठन व इतर पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे निवडणूक प्रभारी तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना अवगत देखील केले आहे.
माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर व मुरब्बी नेतृत्वाकडे नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची सूत्रे सोपवण्यात आल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे. त्यांनी यापूर्वी नांदेड महानगरपालिकेवर एकहाती वर्चस्व राखले असून, या निवडणुकीतही भारतीय जनता पक्षाचाच झेंडा फडकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis