
नाशिक, 20 डिसेंबर, (हिं.स.)। महापालिकेकडून आगामी सिहंस्थ कुंभमेळ्यापूर्वी गोदावरी प्रदूषण मुक्तीच्या फक्त पोकळ गप्पा सुरु असून पाणी प्रदूषित असल्याने नदीपात्रात पानवेलीचा गालिछा पहायला मिळत आहे. रामवाडी ते होळकर पुलापर्यंत नजर जाईल तिथं पर्यंत हिरव्यागार पानवेली पहायला मिळतात. त्यामुळे गोदा प्रेमीमध्ये प्रचंड नाराजी असून गोदा स्वच्छतेचे पैसे जातात कुठे असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित करत आहेत.
दक्षिण गंगा अशी ख्याती असलेली गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. महापालिकेकडून गोदा प्रदूषण मुक्तीसाठी सुरु असलेल्या उपाय योजना कागदरच राबवल्या जात आहे. पुढील दोन वर्षानी नाशिकला कुंभ मेळा होत असून गोदा प्रदूषण मुक्तीसाठी दीड हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. परंतु बारा वर्षा पूर्वीच्या कुंभ मेळ्यातही गोदा प्रदूषण मुक्त करू अशी केलेली घोषणा हवेत विरल्याचे चित्र आहे. आता कुंभमेळा तोंडावर आला असतांना गोदेचा प्रदूषण मुद्दा तापला असून गोदा पात्राला जिकडे पाहावे तिकडे पान वेलीचा विळख पडला आहे. पावसाळा संपला असून नदी पात्रात प्रदूषित पाणी आहे. त्यामुळे पानवेली मोठ्या प्रमाणात फोफावल्या आहेत. अगदी नवश्या गणपतीपासून ते होळकर पुलापर्यंत जिकडे तिकडे पानवेली पाहायला मिळतात. महापालिकेकडून पानवेली काढण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पर्यावरण गोदा प्रेमी नाराज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन आठवड्यापूर्वी रामकाल पथचे उदघाटन करण्यासाठी नाशिकला आले होते. त्यावेळी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली होत्या. त्यांच्या समोर पानवेली नको दिसायला यासाठी गंगापूर धरणातून गोदेला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे सर्व पानवेली वाहून गेल्या. परंतु आता पुन्हा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली आल्या आहेत. न्यायालयाने प्रदूषण रोखण्यासाठी गोदावरी प्रदूषण नियंत्रण उपसमिती गठीत केली आहे. परंतु त्यात फक्त कागदी घोडे नाचवले जात असून ठोस उपाय योजना राबवल्या जात नाही. अजूनही अनेक ठिकाणी गटारीचे व सांडपाणी नदी पात्रात सोडले व मिसळत असल्याचे दिसते.
पाणवेलींविरोधात आज मानवी साखळी शहरातील राजमाता अहिल्यादेवी होळकर पूल ते रामवाडी पुलापर्यंत गोदावरी नदीपात्रात पाणवेली वाढल्या आहेत. हरित नाशिक गोदापात्रात कशाला? असा प्रश्न करीत रविवारी (दि. २१) 'गोदा वॉक वे' या जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला नदीकिनरी मानवी साखळी करून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
चौकट
गोदा प्रेमाचा नुसता पुळकापावसाचे पाणी वाहून गेले असून नदी पात्रात आता प्रदूषणयुक्त पाणी आहे. त्यामुळे आता पानवेली वाढण्यास सुरुवात झाली आहे. या लवकर काढल्या नाहीत तर पनवेली आणखी फोफावतील.कुंभमेळा तोंडावर असतांना देखील मनपाचे याकडे दुर्लक्ष लाजिरवाणी बाब आहे.--निशिकांत पगारे, गोदावरी संवर्धन समिती अध्यक्ष
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV