परभणीत 26 व 27 डिसेंबरला जिल्हास्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन
परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, संशोधनवृत्ती तसेच सर्जनशील नवकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने परभणी येथे जिल्हास्तरीय भव्य विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय विज्ञान महोत्सव 26 व 27 डिसें
परभणीत 26 व 27 डिसेंबरला जिल्हास्तरीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन


परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जिज्ञासा, संशोधनवृत्ती तसेच सर्जनशील नवकल्पनांना चालना देण्याच्या उद्देशाने परभणी येथे जिल्हास्तरीय भव्य विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय विज्ञान महोत्सव 26 व 27 डिसेंबर रोजी नांदखेडा रस्त्यावरील क्वीन्स स्कूलमध्ये पार पडणार आहे.

कॉस्मोपॉलिटन एज्युकेशनल अँड वेल्फेअर सोसायटी आणि जिल्हा परिषद, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाला भारताचे थोर अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विज्ञान महोत्सव भव्य व प्रेरणादायी स्वरूपात होणार आहे.

या विज्ञान महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी विविध आकर्षक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शास्त्रज्ञांसोबत प्रकट मुलाखत, विविध विज्ञान कृती व स्पर्धा, शिक्षकांसाठी शैक्षणिक साधन निर्मिती स्पर्धा, रिसर्च पेपर सादरीकरण स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिके व मॉडेल्सची प्रदर्शनी, विज्ञानाधारित नाटिका व खेळ तसेच विज्ञान प्रश्‍नमंजुषा स्पर्धा यांचा समावेश आहे. सर्व स्पर्धांमधील विजेते, उपविजेते तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ट्रॉफी, लॅपटॉप व टॅबलेट यांसारखी आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.

या विज्ञान महोत्सवाला भेट देण्यासाठी तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करावी, तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभाग वाढवण्यासाठी सोबत देण्यात आलेल्या https://aftabmaliksir.github.io/Science-Festival-/GoogleForm लिंकद्वारे विद्यार्थ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना डॉ. अनिल काकोडकर यांच्या उपस्थितीत चर्चा, प्रश्‍नोत्तरे, वैज्ञानिक प्रयोग, मॉडेल्सचे प्रदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जाणीव व नवोन्मेषी दृष्टिकोन वाढवण्यासाठी या भव्य विज्ञान महोत्सवात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख खासदार डॉ. फौजिया खान आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande