मराठी शाळा वाचविण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा
रायगड, 20 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल |बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मराठी शाळा जाणिवपूर्वक बंद करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप करत मराठी अभ्यास केंद्र तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात
मराठी शाळा वाचविण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा


रायगड, 20 डिसेंबर (हिं.स.)। पनवेल |बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मराठी शाळा जाणिवपूर्वक बंद करण्याचे कटकारस्थान रचले जात असल्याचा आरोप करत मराठी अभ्यास केंद्र तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मराठी भाषा, शिक्षण आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या विविध माध्यमांच्या २८ शाळा गेल्या तीन वर्षांत बंद करण्यात आल्या असून, त्यापैकी १७ मराठी शाळांचा समावेश आहे. मराठी शाळांसाठी लागणारा २ हजार कोटी रुपयांचा खर्च जास्त वाटतो; मात्र कुंभमेळ्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यास शासन तयार आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. मराठी भाषा वाचवण्याचे आवाहन होत असताना प्रशासन मात्र मराठी शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

मराठी शाळांच्या इमारतींकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांना खाजगी शाळांमध्ये पाठवण्याचे कारस्थान रचले जात आहे. शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या पायाभूत सुविधा, इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिले जाणारे प्राधान्य आणि मराठी विद्यार्थ्यांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे मराठी शिक्षण गंभीर संकटात सापडले असल्याचा आरोप करण्यात आला.

मोर्चाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन करून करण्याचे आयोजकांचे नियोजन होते. मात्र पोलिसांनी मनाई केल्यानंतर चार-चार जणांना स्मारकावर अभिवादन करण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, कॉ. प्रकाश रेड्डी, अभिनेत्री चिन्मयी सुमित, डॉ. दिपक पवार आदींनी हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर महाराष्ट्र गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.

मोर्चा महापालिकेच्या दिशेने निघाल्यानंतर पोलिसांनी अडथळे निर्माण केले. महापालिका मुख्यालयाजवळ आंदोलकांना आझाद मैदानात नेण्यात आले. आयुक्तांशी भेट होईपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला. अखेर शिष्टमंडळाला भेटीची वेळ देण्यात आली असून मराठी शाळांचे अस्तित्व व संवर्धनासाठी लढा सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande