
नाशिक , 20 डिसेंबर (हिं.स.)। वारकरी सांप्रदायिक श्रोत्यांसाठी आणि पारमार्थिकांसाठी, अध्यात्मिक चिंतनाची पर्वणी मानली जाणारी “वै. परमपूज्य श्रीगुरु भानुदास महाराज देगलूरकर स्मृती व्याख्यानमाला” यंदा २३ ते २५ डिसेंबर २०२५ या कालावधीत परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली आहे. सद्गुरु सेवा समिती, नाशिक यांच्या वतीने होणाऱ्या या व्याख्यानमालेचा विषय “आता विश्वात्मकु हा माझा” असा असून नाशिक व परिसरातील सर्व वारकरी बांधवांमध्ये या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
व्याख्यानमालेचा कार्यक्रम : तीन दिवस चालणारी ही व्याख्यानमाला मंगळवार दि. २३ डिसेंबर ते गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ या दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता होणार असून प्रवेश सर्वांसाठी खुला आहे.
नाशिक शहरातील प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परशुराम सायखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असल्याने मोठ्या संख्येने रसिक उपस्थित राहतील, असा आयोजकांना विश्वास आहे. प्रमुख वक्ते आणि विषयवैशिष्ट्य : या व्याख्यानमालेत परम आदरणीय, परमश्रद्धेय “वक्ता दशसहस्त्रेशु” श्रीगुरु चैतन्यमहाराज देगलूरकर (पंढरपूर) आपल्या प्रासादिक वाणीमधून “आता विश्वात्मकु हा माझा” या विषयाचे सखोल निरूपण करणार आहेत. संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ व ज्ञानदेव-ज्ञानोबारायांच्या वाङ्गमयावर आधारित, सुटसुटीत भाषेत अध्यात्मिक तत्त्वांचे विवेचन करणे ही चैतन्यमहाराजांच्या प्रवचनशैलीची जमेची बाजू मानली जाते.
वारकरी श्रोत्यांसाठी विशेष आकर्षण : ज्ञानदेव-तुकारामांच्या परमार्थतत्त्वांचे रसाळ भाष्य, संतचरित्रातील दृष्टांत आणि नामस्मरणाचा गोडवा यांचा संगम या व्याख्यानमालेत अनुभवायला मिळणार असून, श्रवणातून अध्यात्मिक उन्नतीची संधी लाभणार आहे, असे सद्गुरु सेवा समितीने कळविले आहे. वारकरी सांप्रदायिक बांधवांनी तसेच नाशिककरांनी या “श्रवणसुखा”चा लाभ घ्यावा आणि परिचित वारकरी बंधूभगिनींपर्यंत कार्यक्रमाची माहिती पोहोचवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV