
रत्नागिरी, 20 डिसेंबर, (हिं. स.) : 'सह्याद्री क्लासिक' सायकलिंग स्पर्धेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सुपर रॅंडोनिअर (एसआर) विनायक विजय पावसकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ११३ स्पर्धकांमधून तीन गटांमध्ये विनायक पावसकर यांनी ५ वा क्रमांक पटकावला.
या कामगिरीमुळे रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि रत्नागिरीचे नाव अधिक उंचावले आहे. विनायक पावसकर यांनी सांगितले की, घाट उंच नसतात, उंच असते आपल्या प्रयत्नांची मर्यादा. हा संपूर्ण प्रवास फक्त पायांनी पॅडल मारण्याचा नसून तो 'स्वतःला हरवून पुन्हा सापडण्याचा' मानसिक प्रवास होता. स्पर्धेतील पहिला टप्पा होता तापोळा घाट, जो २६ किलोमीटरचा आणि ७३२ मीटर एलिवेशनचा आव्हानात्मक चढण मार्ग होता. शरीर थकले तरीही पहिल्या ग्रुपसोबत राहण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवत जोरदार सायकलिंग केले. हा टप्पा १ तास १८ मिनिटांत पूर्ण करून ५ वे स्थान मिळवले.
दुसऱ्या टप्प्यासाठी, म्हणजेच केळघर घाटासाठी, विनायक यांनी ॉअनुभवी सायकलस्वार प्रसाद आणि विक्रांत आलेकर यांच्या सल्ल्यानुसार नवीन स्ट्रॅटेजी केली आणि शेवटच्या ३ किलोमीटरमध्ये स्वतःची ओळख दाखवण्याची' योजना निश्चित केली. हा १६ किलोमीटरचा टप्पा ५९५ मीटर एलिव्हेशनचा असूनही, विनायक यांनी डोके शांत ठेवून खेळ केला. पहिल्या ग्रुपपासून थोडे मागे पडले असले तरी, अजित कुलकर्णींसोबतची त्यांची लढत निर्णायक ठरली. त्यांनी हा टप्पा केवळ ६० मिनिटांत पूर्ण करत चौथ्या क्रमांकाने फिनिश लाइन गाठली.
संपूर्ण स्पर्धेतील एकूण ११३ स्पर्धक आणि ३ गटांमधून विनायक पावसकर यांनी पाचवा क्रमांक मिळवला. त्यांचा चौथा क्रमांक अवघ्या १७ सेकंदांनी हुकला. मात्र या अनुभवाने स्वतःवरचा अधिक दृढ झालेला विश्वास. टीम रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची भक्कम साथ आणि कुटुंबीय आणि मुलांचा त्यांच्या यशावर असलेला ठाम विश्वास यांची कमाई त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी