
मुंबई, 20 डिसेंबर (हिं.स.)। येस सिक्युरिटीजने आपल्या प्रमुख गुंतवणूकदार शिक्षण उपक्रम वोंगाविटस चा सीझन 2 यशस्वीपणे पूर्ण केला. 19 डिसेंबर रोजी मुंबईतील सांताक्रूझ येथील येस बँक हाऊस येथे उत्साहपूर्ण ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले.
अंतिम फेरीमध्ये देशभरातून आलेले 10 अंतिम फेरीतील संघ सहभागी झाले होते. प्रत्येकी दोन सदस्य असलेल्या या संघांनी वोंगाविटस सीझन 2 च्या विजेतेपदासाठी स्पर्धा केली. देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या स्पर्धकांनी भांडवली बाजार, अर्थशास्त्र, वैयक्तिक वित्त आणि सध्याच्या आर्थिक घडामोडी याबाबत सखोल ज्ञान व कौशल्य यांचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमाला येस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल अर्जारे, येस बँकेचे कार्यकारी संचालक तसेच येस सिक्युरिटीजचे नॉन-एक्झिक्युटिव्ह संचालक राजन पेंटल आणि येस बँकेचे मुख्य विपणन अधिकारी निपुण कौशल उपस्थित होते. आर्थिक साक्षरता मजबूत करणे आणि भविष्यासाठी सज्ज प्रतिभा घडवणे या सामायिक उद्दिष्टाबाबतची बांधिलकी यातून स्पष्ट झाली.
अंतिम फेरीकडे जाणारा प्रवास अत्यंत चुरशीचा होता. प्रत्येक सहभागी शहरात प्राथमिक फेऱ्यांमध्ये सुमारे 400 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांच्या-त्यांच्या शहरांतील सर्वोत्तम कामगिरी करणारे संघ अनेक टप्प्यांतून पुढे जात अखेर अंतिम 10 संघांपर्यंत पोहोचले आणि त्यांना मुंबईतील राष्ट्रीय ग्रँड फायनलमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. यामधून या उपक्रमाचा व्यापक स्तर, कठोर कौशल्य आणि अखिल भारतीय व्याप्ती अधोरेखित झाली. अत्यंत अटीतटीच्या अंतिम फेरीनंतर, प्रभात शर्मा आणि तनिष अग्रवाल यांचा समावेश असलेल्या टीम एनआयटी रायपूर संघाने वोंगाविटस सीझन 2 चे विजेतेपद पटकावले. तीव्र, प्रखर बुद्धिमत्ता, वेग आणि धोरणात्मक सखोल कौशल्यांनी भरलेल्या या स्पर्धेत त्यांनी विजय मिळवला.
कबीर दुबे आणि मानस विश्वकर्मा यांनी प्रतिनिधित्व केलेल्या टीम आयआयटी भोपाळ संघाने प्रथम उपविजेतेपद मिळवले. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या टायब्रेकर स्पर्धेत टीम आयआयटी गुवाहाटी मधील यश देव सिंह आणि दिव्यम कुलश्रेष्ठ यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळवले.
या प्रसंगी बोलताना येस सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंशुल अर्जारे म्हणाले: “वोंगाविटस ही संकल्पना भविष्यातील पिढ्यांसाठी वित्त विषयक ज्ञान आकर्षक, स्पर्धात्मक आणि सुसंगत बनवण्यासाठी तयार करण्यात आली. सीझन 2 मध्ये देशभरातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. त्यातून आर्थिक व बाजार विषयक संकल्पनांची लवकर ओळख आत्मविश्वासपूर्ण व माहितीपूर्ण निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते या आमच्या विश्वासाला पुष्टी मिळाली. या सकारात्मक प्रतिसादाच्या जोरावर वोंगाविटस 2026 मध्ये अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात परत येणार असून त्याचा विस्तार आणखी मोठ्या प्रमाणावर केला जाईल.”
वोंगाविटस सीझन 2 च्या अंतिम फेरीच्या जोडीला या कार्यक्रमात द वाईज व्हिस्पर्स सिझन 2 अॅन्युअल क्विझच्या विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला. या वर्षी या स्पर्धेला 12,009 नोंदणींसह आतापर्यंतचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. प्रथमच ही क्विझ हायब्रिड स्वरूपात घेण्यात आली. त्यात ऑनलाइन सहभागासोबतच शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये ऑफलाइन फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे ही स्पर्धा अधिक लहान वयोगटापर्यंत पोहोचू शकली. या सत्राचा समारोप ऑनलाइन स्वरूपातून तीन आणि ऑफलाइन स्वरूपातून तीन अशा प्रकारे एकूण सहा विजेत्यांसह झाला. त्यायोगे शालेय स्तरावर सुव्यवस्थित आर्थिक शिक्षणाबद्दल वाढत असलेली रुची मजबूत झाली.
वोंगाविटस हा येस सिक्युरिटीजच्या गुंतवणूकदार शिक्षण उपक्रमांचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ असून भारतातील तरुणांमध्ये वित्त विषयक कुतूहल, जागरूकता आणि व्यावहारिक समज वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवला जातो. दोन यशस्वी सत्रांनंतर, हा उपक्रम आणखी विस्तारण्याच्या तयारीत असून, देशभरातील अधिक कॅम्पस आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule