
परभणी, 20 डिसेंबर (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे. किमान तापमान ५.५ अंश असे नोंदल्या गेले असून यंदाच्या हिवाळ्यात परभणीकरांची हुडहुडी अद्यापही कायम आहे. डिसेंबर महिन्यातील सुरुवातीच्या काही दिवसांच अपवाद वगळता किमान तापमान कायमच आठ अंशाच्या खाली राहिले आहे.
डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर वाढला. त्याचा येथील जनजीवनावरही परिणाम झाला आहे. नदी तसेच कालव्यांना पाणी असल्याने वातावरणात कायमच गारठा जाणवत आहे. दुपारचे काही तास वगळता दिवसभर थंडीचा अनुभव परभणीकर सध्या घेत आहेत. सायंकाळी सूर्यास्तापूर्वीच थंडी जाणू लागली आहे. रात्री आठ नंतर रस्त्यावरच्या रहदारीवरही या थंडीचा परिणाम जाणवत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis