
अॅडलेड, 21 डिसेंबर (हिं.स.)ऑस्ट्रेलियाने अॅशेस ट्रॉफी कायम राखली आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघाने अॅडलेड टेस्टमध्ये इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव करून अॅशेस ट्रॉफी राखली. बेन स्टोक्सच्या इंग्लंड संघाचे अॅशेस जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. ऑस्ट्रेलिया आता पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी आघाडीवर आहे.
अॅडलेडमधील तिसऱ्या अॅशेस कसोटीच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडने मालिकेत आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा खूप प्रयत्न केला. जेमी स्मिथ, विल जॅक्स आणि ब्रायडन कार्से यांनी सामना जवळ आणला, तरी मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्या जोडीने इंग्लंडला ४३५ धावांचे लक्ष्य गाठण्यापासून रोखले. इंग्लंडला शेवटच्या डावात फक्त ३५२ धावा करता आल्या. अॅलेक्स कॅरीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या डावात १०६ धावा, दुसऱ्या डावात ७२ धावा आणि सहा झेलही घेतले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ३७१ धावांच्या एकूण धावसंख्येच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने २८६ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ४३५ धावांचे आव्हान ठेवले, ट्रॅव्हिस हेडच्या शानदार १७० धावांच्या मदतीने ३४९ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांसाठी मोठे आव्हान उभे केले. चौथ्या दिवशी इंग्लंडने ६ बाद २०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर विजय अशक्य वाटू लागला होता.
पाचव्या आणि शेवटच्या दिवशी जेमी स्मिथच्या ६० धावांच्या खेळीमुळे इंग्लंडच्या विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. पण तो बाद झाला तेव्हा इंग्लंडची धावसंख्या २८५ पर्यंत पोहोचली होती. संघ लक्ष्याच्या जवळ पोहोचत असल्याचे दिसत होते. पण त्यानंतर विल जॅक्स ४७ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर जोफ्रा आर्चर बाद झाला. इंग्लंडला जोश टंगच्या रूपात शेवटचा धक्का बसला. ब्रायडन कार्स ३९ धावांवर नाबाद राहिला. या कसोटीत दोन्ही डावात मिळून ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा, मिशेल स्टार्कने चार, स्कॉट बोलँडने चार आणि नाथन लायनने पाच विेकेट्स घेतल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे