'बार्टी' एक  समता प्रस्थापित करणारी सामाजिक चळवळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ''बार्टी'' या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा २२ डिसेंबर हा ४७ वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश* महाराष्
Barti


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात 'बार्टी' या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या स्वायत्त प्रशिक्षण व संशोधन संस्थेचा २२ डिसेंबर हा ४७ वा वर्धापन दिन. या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या कार्यावर टाकलेला प्रकाश*

महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात अनेक चळवळी उदयास आल्या .काही काळापुरत्या, काही क्षणिक, तर काही दीर्घकाल टिकून राहणाऱ्या. पण बार्टी, अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ही संस्था नव्हे तर ती एक समता प्रस्थापनेसाठी जणू चळवळ म्हणून काम गेल्या ४७ वर्षापासून अनुसूचित जातींसाठी काम करीत आहे आहे.

ही संस्था केवळ एका विषयापुरती मर्यादित नाही; तर शिक्षण, प्रशिक्षण,संशोधन,लेखन, मूल्यमापन, सामाजिक न्याय, समता आणि सांस्कृतिक पुनरुज्जीवन यांचा संगम आहे. त्यामुळेच बार्टी ही संस्था नसून एका विचारसरणीची सतत चालती-बोलती मोहीम आहे.

बार्टीच्या स्थापनेमागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भक्कम पाया आहे. महाराष्ट्र शासनाने सामाजिक समता या विषयावर सखोल अभ्यास,संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य व्हावे या उद्देशाने या संस्थेची १९७९ मध्ये मुंबईमध्ये स्थापना केली. पुढे ही संस्था १९८७ मध्ये पुण्यात स्थलांतरित झाली.या संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये स्वायत्तता यावी व संस्थेचे काम अधिक जलदगतीने व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाने सन २००८ मध्ये या संस्थेला 'यशदा' या प्रशिक्षण संस्थेसारखा स्वायत्तेचा दर्जा दिला. बार्टीच्या धर्तीवर आज विविध समाजाच्या उत्कर्षासाठी अनेक संस्था उदयाला आलेल्या आहेत. त्यामध्ये सारथी, महाज्योती आर्टी या संस्थांचा समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले असून त्यांच्या नियंत्रणाखाली संस्थेचे कामकाज सुरू आहे. त्याचबरोबर या नियमाक मंडळामध्ये विविध खात्यातील सुमारे १० वरिष्ठ सनदी अधिकारी यांचा समावेश आहे.संस्थेने ४७ वर्षात अनेक महत्त्वपूर्ण काम केली आहेत. अलीकडे संस्थेचा व्यापक विस्तार झाला असून संस्थेची ध्येय, उद्दिष्ट याप्रमाणे विविध सामाजिक समतेशी निगडित संशोधन प्रकल्प,वंचित घटकासाठी काम करणारे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षण, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची प्रशिक्षणाद्वारे क्षमतावृद्धी, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे मूल्यमापन, विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य,उद्योजकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम, ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्याची जाणीव जागृती, त्याचबरोबर महापुरुषांच्या कार्याचा जागर व्हावा यासाठी अनेक कार्यक्रम, उत्सव या संस्थेच्या माध्यमातून होतात.समाजातील वंचित, पीडीत, उपेक्षित माणसाला आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांचाच विचार पुढे नेण्याचे काम ही संस्था करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधित महाड येथील चवदार तळे येथील स्मारक, येवला येथील प्रेरणाभूमी, स्मारक याची देखभाल व दुरुस्ती व तसेच येथे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्याची जबाबदारीही या संस्थेकडे आहे. वंचित, मागास, आणि आर्थिक स्थितीने दुर्बल असलेल्या तरुणांना केवळ स्वप्ने दाखवणे नाही, तर त्यांच्या स्वप्नांना बळ देणे व त्यांना स्वप्नांच्या दिशेने नेणे, त्याची वाट दाखवणे हे काम 'बार्टी' सातत्याने करते.बार्टीचा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा प्रकल्प आहे तो राजधानी दिल्ली सह राज्यभर विस्तारला आहे.बार्टीने स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण सुरू केले, तेव्हा हा उपक्रम फार मोठा आणि धाडसी होता. UPSC-MPSC सारख्या परीक्षांसाठी लाखो रुपये खर्च होतात, कोचिंगची सुविधा सहज सर्वसामान्य गरीब विद्यार्थ्यांसाठी मिळत नाही. पण बार्टीने हे सर्व मोफत उपलब्ध करून दिले. योग्य मार्गदर्शन, अभ्यास साहित्य, तज्ज्ञ प्राध्यापक, निवासी प्रशिक्षण व शिस्तबद्ध वातावरण यामुळे महाराष्ट्रातील हजारो तरुणांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. एखाद्या तरुणाचे आयुष्य बदलणे म्हणजे त्याच्या कुटुंबाच्या आणि पुढच्या पिढ्यांच्या भविष्यामध्ये प्रकाश पेरणे होय. अशी हजारो घरात प्रकाश पेरण्याचे व त्या घरांना उजळवण्याचे काम 'बार्टीने 'केले आहे. हीच सामाजिक जागृती आणि सक्षमीकरणाची खरी चळवळ आहे. त्यात बार्टी झोकुन देऊन काम करत आहे.सामाजिक संशोधन हे बार्टीचे दुसरे मजबूत अंग आहे. विविध जाती,समाजांची शैक्षणिक स्थिती, आर्थिक प्रगती, रोजगार, आरक्षणाची अंमलबजावणी, सामाजिक विषमता, ग्रामीण-शहरी तफावत, तरुणांचे कौशल्य या आणि अशा अनेक विषयांवर बार्टीने संशोधनात्मक अभ्यास केला. धोरणनिर्मिती करणाऱ्यांना दिशा देणे, समाजातील समस्या वैज्ञानिक पद्धतीने ओळखणे आणि त्यावर उपाय सूचवणे ही परिवर्तनाची बौद्धिक बाजू आहे. त्यामुळे बार्टी आपल्या संशोधन विभागामार्फत अनेक संशोधन प्रकल्प राबवून हे काम करीत आहे.

आर्थिक सबलीकरण हा सामाजिक समतेचा मुख्य पाया आहे. फक्त नोकरीच्या संधी वाढविल्या जाऊन समाज बदलत नाही; तर तरुणांनी स्वयंरोजगार, व्यवसाय आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातही उतरले पाहिजे. त्यासाठी बार्टीने अनेक उद्योजकता विकास कार्यक्रम राबवले, तरुणांना वित्तीय ज्ञान दिले, स्टार्टअप सुरू करण्याचे कौशल्य शिकवले आणि उद्योग उभारण्यासाठी आवश्यक मानसिकता निर्माण केली. आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे म्हणजे सामाजिक साखळ्या तुटणे आणि स्वतःचे भविष्य स्वतः घडवणे. ही प्रक्रिया वेगाने वाढत आहे आणि बार्टीची ही चळवळ गावोगावी पोहोचत आहे. तरुणांना उद्योगाकडे वळविण्यासाठीही बार्टीचा मोठा सहभाग आहे.आज कौशल्य विकास विभागामार्फत असे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू आहेत. त्याचबरोबर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीही संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण, शिष्यवृत्ती दिली जाते त्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जेईई, नीट, अभियांत्रिकी, न्यायालयीन सेवा, स्टाफ सिलेक्शन, लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा समावेश आहे. दरवर्षी संस्थेमार्फत हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. त्याचबरोबर मुख्य परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना मुलाखतीला तोंड देण्यासाठी आर्थिक सहाय्य ही संस्था करते.त्याचबरोबर शिव ,फुले- शाहू, आंबेडकरी, अण्णाभाऊ साठे साहित्य निर्मितीसाठी तसेच हे साहित्य अत्यंत अल्प किमतीमध्ये सर्वदूर सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचेल, यासाठी बार्टीचा विस्तार व सेवा तसेच प्रकाशन प्रसिद्धी विभाग प्रयत्नरत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान आणि ज्या संविधानामुळे संबंध देश एकसंध आहे त्या संविधानाचा प्रचार- प्रसार देशात जर सर्वाधिक कोणी केला असेल तर तो बार्टी या संस्थेने. या संस्थेने आतापर्यंत लाखो संविधानाच्या प्रति अत्यंत कमी दरात लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. यासाठी स्वतंत्र भांडार निर्माण केले आहे. संविधानिक मूल्यांचा प्रसार तसेच समाजातील अज्ञान, अंधकार, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा नष्ट करण्याचे कामही संस्थेचे सुमारे ३०० समतादूत करीत आहेत तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रचार- प्रसार करण्याचे कामही राज्यभर हे समतादूत रोज करतात. व्याख्याने प्रबोधनाचे कार्यक्रम, प्रकाशने, ग्रंथालय सेवा, सांस्कृतिक कार्यक्रम, संशोधनपर ग्रंथ, डॉ. आंबेडकरांच्या विविध पैलूंचा तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छ.शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचे काम संस्था सातत्याने करते. अशा कार्यक्रमांमुळे नव्या पिढीत सामाजिकता, बौद्धिकता वाढत आहे.यातून समाजाचे विचारविश्व बदलले तरच समाज बदलतो या तत्त्वावर बार्टी उभी आहे.

आजची बार्टी डिजिटल पिढीसाठी नवे आयाम उघडत आहे. ऑनलाईन कोर्सेस, डिजिटल प्रशिक्षण मॉड्यूल्स, व्हर्च्युअल क्लास, वंचित विद्यार्थ्यांसाठी इंटरनेट-आधारित संधी निर्माण करणे हे सर्व आधुनिक उपक्रम सामाजिक परिवर्तनाची, नव्या युगाची आहेत . पूर्वी गावात कोणी 'आयएएस'अधिकारी पाहिला नसेल; पण आता त्या गावातीलच एखादा मुलगा किंवा मुलगी आयएएस'अधिकारी होऊन परत जाते आणि समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणा ठरते. हे परिवर्तन सहज घडत नाही; त्यासाठी काही संस्था, माणसं काम करत असतात. यामध्ये बार्टी अग्रेसर आहे. बार्टीच्या माध्यमातून अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना थेट दिल्लीमधील नामवंत क्लासेसमध्ये मोफत प्रशिक्षण दिले जाते या संस्थांच्या माध्यमातून अनेक जण केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस' आयपीएस, सनदी अधिकारी झाले आहेत. यात बार्टीची मोठी भूमिका आहे. संस्थेच्या माध्यमातून पीएचडीसाठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फेलोशिपच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते, यामुळे अनेक जण उच्चविद्याविभूषित व पीएचडी धारक बनले आहेत. बार्टी अनुसूचित जातींच्या कल्याणासाठी, त्यांच्या उत्थानासाठी संस्थेचे प्रेरणास्थान व सामाजिक न्याय खात्याचे मंत्री ना. संजय शिरसाठ, खात्याचे प्रधान सचिव मा.डॉ. हर्षदीप कांबळे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाने निरंतरपणे चौफेर वाटचाल करत आहे.अनेक योजनांमुळे बार्टीने समाजात स्वाभिमानाची परंपरा निर्माण केली. ‘मी काही करू शकतो’, ‘माझ्याकडेही क्षमता आहे’, ‘माझेही स्थान आहे’,हा आत्मविश्वास जेव्हा एखाद्या वंचित समुदायात जागा होतो, तेव्हा तो समुदाय चळवळीत सामील झाल्याशिवाय राहत नाही. बार्टीने निर्माण केलेली ही मानसिक क्रांतीची मशाल तिची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. अलीकडे काही जण जाणीवपूर्वक बार्टीचे नाव मलीन करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनी बार्टीने केलेले अनेक सकारात्मक कामेही जाणून घेतली पाहिजेत,याची यादी खूप मोठी आहे.

बार्टी ही संस्था सरकारी कार्यालय नसून समाजाचा मानबिंदू आहे. तिच्या उपक्रमांतून होणारा बदल केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नाही, तर तो कुटुंब, समाज, प्रदेश आणि राज्याला स्पर्श करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, शिक्षणाची कास धरलेले भविष्य आणि समानतेवर आधारित सामाजिक बांधणी हे सर्व घटक या संस्थेनं पुढे नेले आहेत. बार्टी केवळ एका विषयावरच काम करत नाही तर अनेक विषय घेऊन बार्टी काम करत आहे. बार्टीने आपल्या कार्याच्या विविध कक्षा रुंदावल्या आहेत. संस्थेने अनेक समविचारी सरकारी संस्था, इतर राज्यातल्या संस्था यांच्याबरोबर सामंजस्य करारही केले आहेत. खरे तर संस्था आज विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहे, त्यामुळेच अनेक होतकरू व गरीब विद्यार्थ्यांचे संस्थेमुळे स्वप्न साकार झालीत,त्यामुळेच समता, शिक्षण, संशोधन, आर्थिक प्रगती आणि सामाजिक न्याय यांचा अखंडित प्रवाह बनली आहे. महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाचा हा आधुनिक अध्याय बार्टीशिवाय अपूर्णच राहील.

*-डॉ. बबन जोगदंड* विभागप्रमुखविस्तार व सेवा ,बार्टी, पुणे9823338266

-------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande