
मुंबई, 21 डिसेंबर (हिं.स.)। टेक दिग्गज गूगलने आपल्या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म गूगल पे वर ‘फ्लेक्स’ ही नवी डिजिटल क्रेडिट सुविधा सादर केली आहे. भारतातील सर्वसामान्य वापरकर्त्यांना दैनंदिन व्यवहारांसाठी क्रेडिटपर्यंत सहज प्रवेश मिळावा, या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे. रूपे नेटवर्कवर आधारित असलेले गूगल पे फ्लेक्स हे पूर्णपणे डिजिटल को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड असून ते थेट गूगल पे अॅपमध्येच इंटीग्रेट करण्यात आले आहे. यूपीआयच्या सोप्या वापरासोबत क्रेडिट लाइनची सुविधा एकत्र आणणारा हा नवा पर्याय असल्याचे गूगल कडून सांगण्यात आले आहे.
फ्लेक्स अंतर्गत पहिला प्रोडक्ट म्हणून गूगल पे फ्लेक्स ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड सादर करण्यात आले असून ते ॲक्सिस बँक सोबतच्या भागीदारीत लाँच करण्यात आले आहे. हे कार्ड केवळ गूगल पे अॅपच्या माध्यमातूनच उपलब्ध असून वापरकर्त्यांना कोणतेही फिजिकल पेपरवर्क न करता काही मिनिटांत कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज मंजूर होताच कार्डचा वापर तात्काळ सुरू करता येतो, अशी माहिती गूगल पे ने आपल्या ब्लॉग पोस्टद्वारे दिली आहे.
Google च्या मते, भारतात सध्या सुमारे ५० दशलक्ष क्रेडिट कार्डधारक आहेत. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांपर्यंत क्रेडिट सुविधा पोहोचवण्यासाठी Flex ही नवी डिजिटल क्रेडिट लाइन सुरू करण्यात आली आहे. हे कार्ड RuPay नेटवर्कवर आधारित असल्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा लाखो व्यापाऱ्यांकडे पेमेंटसाठी वापरता येणार आहे. व्यवहाराची प्रक्रिया अगदी UPIप्रमाणेच सोपी असून, क्रेडिट कार्ड वापरूनही UPIसारखाच अनुभव मिळतो.
Flex कार्डसोबत Google Pay आणि Axis Bank कडून रिवॉर्ड सिस्टिमही देण्यात येत आहे. प्रत्येक व्यवहारावर वापरकर्त्यांना ‘स्टार्स’ मिळणार असून प्रत्येक स्टारची किंमत १ रुपया आहे. हे स्टार्स पुढील कोणत्याही व्यवहारात तात्काळ रिडीम करता येणार आहेत. याशिवाय पारंपरिक क्रेडिट कार्डप्रमाणेच Flex कार्डवर फ्लेक्सिबल रिपेमेंटचे पर्याय उपलब्ध असतील. वापरकर्ते संपूर्ण रक्कम भरू शकतात किंवा बिल EMIमध्ये रूपांतरित करू शकतात.
Google Pay Flex मध्ये इन-अॅप कंट्रोल्स देण्यात आले असून ट्रान्झॅक्शन लिमिट सेट करणे, कार्ड ब्लॉक किंवा अनब्लॉक करणे तसेच PIN रीसेट करणे अशा सुविधा थेट अॅपमधून करता येतील. ही सेवा आजपासून हळूहळू रोलआउट होत असून येत्या काही महिन्यांत अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा Google चा मानस आहे. सध्या इच्छुक वापरकर्ते Google Pay अॅपमध्ये वेटलिस्टमध्ये नाव नोंदवू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule