
मुंबई, 21 डिसेंबर (हिं.स.)। गूगलने भारतातील पिक्सल युजर्ससाठी गूगल पिक्सेल अपग्रेड प्रोग्राम नावाचा नवा आणि खास ओनरशिप प्लान सुरू केला आहे. या उपक्रमामागचा उद्देश अधिकाधिक भारतीय युजर्सपर्यंत पिक्सल स्मार्टफोन्स पोहोचवण्याचा असून, विशेषतः व्हॅल्यू फॉर मनीला महत्त्व देणाऱ्या ग्राहकांवर गूगलचा फोकस आहे. या प्रोग्रामच्या माध्यमातून युजर्सना कोणताही अतिरिक्त व्याज न देता सोप्या EMI पर्यायात पिक्सेल फोन खरेदी करता येणार आहे, तसेच ठरावीक कालावधीनंतर नवीन पिक्सेल फोनमध्ये अपग्रेड करण्याची सुविधाही मिळणार आहे.
गूगलने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेअंतर्गत Pixel 10 सीरिजचे स्मार्टफोन्स No Cost EMI वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. EMI ची सुरुवात दरमहा 3333 रुपयांपासून होत असून, एकूण कालावधी 24 महिन्यांचा आहे. Bajaj Finance किंवा HDFC Bank क्रेडिट कार्डद्वारे Pixel 10 सीरिजचा फोन खरेदी करून 24 महिन्यांच्या EMI प्लानमध्ये सहभागी झालेल्या युजर्सना अपग्रेडचा पर्याय दिला जाणार आहे. या प्रोग्राममध्ये 9 EMI भरल्यानंतर आणि 15 वी EMI भरण्यापूर्वी युजर्स नवीन Pixel फोनसाठी पात्र ठरतात.
अपग्रेड करताना युजर्सना आपला जुना Pixel फोन Cashify या गूगलच्या पार्टनरमार्फत ट्रेड-इन करता येणार आहे. यासाठी अट एवढीच आहे की फोन चालू स्थितीत असावा आणि त्यावर कोणतीही अनधिकृत दुरुस्ती झालेली नसावी. Cashify कडून युजरच्या बँक खात्यात उरलेल्या कर्जाइतकी रक्कम ट्रान्सफर केली जाते. त्याच रकमेचा वापर करून जुन लोन क्लोज केलं जाते आणि त्यानंतर नवीन Pixel फोनसाठी पुन्हा 24 महिन्यांची EMI सुरू होते.
या संपूर्ण प्रक्रियेत सर्वप्रथम Pixel 10 सीरिजमधील कोणताही फोन खरेदी करावा लागतो, त्यानंतर 24 महिन्यांची No Cost EMI सुरू होते. नऊ EMI भरल्यानंतर अपग्रेडचा पर्याय उपलब्ध होतो. पार्टनर स्टोअरवर जाऊन जुना Pixel ट्रेड-इन केल्यानंतर नवीन Pixel साठी पुन्हा EMI सुरू केली जाते.
गूगलने या प्रोग्राममध्ये काही अतिरिक्त फायदेही दिले आहेत. अपग्रेडच्या वेळी युजर्सना 7000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळू शकतो. याशिवाय, नवीन Pixel फोनसोबत काही गूगल सेवांचे मोफत ट्रायलही दिले जात आहेत. फोन मॉडेलनुसार एक वर्षापर्यंत Google AI Pro, सहा महिन्यांसाठी Fitbit Premium आणि तीन महिन्यांसाठी YouTube Premium चा ट्रायल या योजनेत समाविष्ट आहे. या नव्या Pixel Upgrade Program मुळे भारतात Pixel फोन खरेदी आणि अपग्रेड करणे अधिक सोपे आणि किफायतशीर ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule