
मुंबई, 21 डिसेंबर (हिं.स.)। मेटा कंपनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत ब्लॉगद्वारे एक महत्त्वाचा अपडेट जाहीर केला आहे. इन्स्टाग्रामसाठी खास टीव्ही अॅपची चाचणी सुरू करण्यात आली असून हा अॅप प्रामुख्याने रील्स पाहण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा उपक्रम सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवला जात असून सुरुवात अमेरिकेत ॲमेझॉन फायर टीव्ही डिव्हाइसेसवर करण्यात आली आहे.
इन्स्टाग्रामच्या ब्लॉग पोस्टनुसार, या टीव्ही अॅपचा पूर्ण भर रील्सवर आहे. अॅपचा होमस्क्रीन मोबाईल इंटरफेसपेक्षा पूर्णपणे वेगळा असेल. टीव्ही रिमोटद्वारे सहज ब्राउझिंग करता यावे यासाठी व्हिडीओ कलेक्शन्स हॉरिजॉन्टल फॉरमॅटमध्ये दाखवण्यात येतील. एखाद्या थंबनेलवर क्लिक केल्यावर संबंधित रील फुल पोर्ट्रेट मोडमध्ये सुरू होईल. स्क्रीनच्या एका बाजूला कॅप्शन तर दुसऱ्या बाजूला लाइक्स, शेअर्स यांसारखी आकडेवारी दिसेल. मोबाईलप्रमाणेच पुढची रील खालीपासून वरच्या दिशेने येईल.
इन्स्टाग्रामच्या प्रवक्त्या क्रिस्टीन पाय यांनी ‘द व्हर्ज’शी बोलताना सांगितले की, या टीव्ही अॅपवर युजर्सना फॉलो केलेल्या अकाउंट्सच्या रील्ससोबतच लोकप्रिय आणि शिफारस केलेला कंटेंटही पाहता येईल. लॉग-इन केल्यानंतर ‘चॅनल्स’ नावाचा नवा विभाग दिसेल, ज्यामध्ये रील्स विषय, थीम आणि ट्रेंडनुसार गटबद्ध केलेले असतील. त्यामुळे स्पोर्ट्स, कुकिंग, म्युझिक किंवा हंगामी कार्यक्रमांशी संबंधित कंटेंट शोधणे अधिक सोपे होईल. काही चॅनल्स संपूर्ण इन्स्टाग्रामवर ट्रेंड होणारा कंटेंट दाखवतील, तर काही पूर्णपणे युजरच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित असतील.
या टीव्ही अॅपमध्ये एकाच वेळी पाच अकाउंट्सपर्यंत लॉग-इन करता येणार आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडीनुसार पर्सनलाइझ्ड रील्स पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. याशिवाय सर्च फीचरही देण्यात आले असून, यामुळे युजर्स आपल्या आवडत्या क्रिएटर्सना शोधू शकतील, रील्सवर आधारित प्रोफाइल्स पाहू शकतील आणि विविध इंटरेस्टशी संबंधित कंटेंट एक्सप्लोर करू शकतील.
आगामी काळात इन्स्टाग्राम टीव्ही अॅपमध्ये आणखी फीचर्स जोडण्याची योजना आहे. फोनला रिमोटसारखा वापरणे आणि चॅनल सर्फिंग अधिक सोपी करणे यावरही कंपनी काम करत आहे. सध्या हा अॅप फक्त अमेरिकेत उपलब्ध असून Fire TV Stick, Fire TV Series 2 आणि Omni TVs या डिव्हाइसेसना सपोर्ट करतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule