

मुंबई, 21 डिसेंबर (हिं.स.)। शाओमीचा सब-ब्रँड रेडमीने भारतीय टॅबलेट बाजारासाठी मोठी घोषणा केली असून कंपनीचा नवा रेडमी पॅड 2 प्रो 5G टॅबलेट लवकरच भारतात दाखल होणार आहे. हा टॅबलेट सप्टेंबर महिन्यात निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये सादर करण्यात आला होता. आता भारतातील लाँचपूर्वी कंपनीने 22 डिसेंबरपासून या टॅबलेटच्या मुख्य वैशिष्ट्यांची अधिकृत माहिती हळूहळू उघड करण्यास सुरुवात करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शाओमी इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर यासाठी खास मायक्रोसाइटही लाईव्ह करण्यात आली असून, रेडमीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून लाँचचा टीझर शेअर केला आहे.
रेडमी पॅड 2 प्रो 5G भारतात कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसह प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सद्वारे विक्रीस उपलब्ध होणार आहे. युरोपमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे 40 हजार रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे, मात्र भारतीय बाजारात हा टॅबलेट 25,000 ते 30,000 रुपयांच्या दरम्यान लाँच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या टॅबलेटचे प्रमुख आकर्षण म्हणजे त्याचा मोठा 12.1 इंचाचा डिस्प्ले. रेडमी पॅड 2 प्रो 5G मध्ये 2.5K रिझोल्यूशनचा (2560 x 1600 पिक्सेल) एलसीडी डिस्प्ले देण्यात आला असून तो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. 16:10 आस्पेक्ट रेशियो आणि 500 ते 600 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळत असल्यामुळे हा टॅबलेट मनोरंजन, गेमिंग तसेच कामासाठी उपयुक्त ठरतो. डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी डिस्प्लेमध्ये TÜV Rheinland फ्लिकर-फ्री आणि लो ब्लू लाइट सर्टिफिकेशन देण्यात आले आहे.
परफॉर्मन्ससाठी या टॅबलेटमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 प्रोसेसर देण्यात आला असून त्यास Adreno 810 GPU ची जोड आहे. रॅमसाठी 6GB आणि 8GB असे पर्याय उपलब्ध असतील, तर स्टोरेज 128GB आणि 256GB पर्यंत मिळेल. याशिवाय मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून स्टोरेज 2TB पर्यंत वाढवण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
ऑडिओच्या बाबतीत रेडमी पॅड 2 प्रो 5G मध्ये क्वाड स्पीकर सेटअप देण्यात आला असून तो Dolby Atmos, Hi-Res Audio आणि तब्बल 300 टक्के वॉल्यूम बूस्ट सपोर्ट करतो. कॅमेरा विभागात मागील बाजूला 8 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे, तर समोर 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा व्हिडिओ कॉलिंग आणि ऑनलाइन मीटिंगसाठी उपयुक्त ठरेल.
या टॅबलेटमध्ये 12,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून ती 33W फास्ट चार्जिंग आणि 27W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअरच्या बाबतीत हा टॅबलेट Android आधारित Xiaomi HyperOS 2 वर चालतो. यामध्ये HyperConnect फीचरसोबत Redmi Pad Pen स्टायलसचा सपोर्टही देण्यात आला आहे, ज्यामुळे नोट्स घेणे आणि क्रिएटिव्ह काम अधिक सोपे होणार आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी 5G सपोर्ट देण्यात आला असून त्यामुळे कुठेही हाय-स्पीड इंटरनेटचा अनुभव घेता येईल. हा टॅबलेट लॅव्हेंडर पर्पल, सिल्व्हर आणि ग्राफाइट ग्रे अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. मोठा डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि दीर्घ बॅटरी लाइफ यामुळे रेडमी पॅड 2 प्रो 5G भारतातील मिड-रेंज टॅबलेट सेगमेंटमध्ये स्पर्धा वाढवेल. विद्यार्थी, प्रोफेशनल्स आणि मनोरंजनप्रेमींसाठी हा टॅबलेट एक आकर्षक पर्याय ठरण्याची शक्यता आहे. लाँचची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नसली तरी, जानेवारी 2026 मध्ये रेडमी नोट सीरिजसोबत हा टॅबलेट भारतीय बाजारात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule