अमेरिका: जेफ्री एपस्टाईनशी संबंधित १६ फाईल्स न्याय विभागाच्या वेबसाइटवरून गायब
वॉशिंग्टन , 21 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (डीओजे) वेबसाइटवरून जेफ्री एपस्टीनशी संबंधित १६ फाइल्स गायब झाल्या आहेत. या फाइल्समध्ये एक छायाचित्रही होते, ज्यामध्ये कथितपणे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. वेबसाइटवर अपलोड केल
अमेरिका: जेफ्री एपस्टाईनशी संबंधित १६ फाईल्स न्याय विभागाच्या वेबसाइटवरून गायब


वॉशिंग्टन , 21 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेच्या न्याय विभागाच्या (डीओजे) वेबसाइटवरून जेफ्री एपस्टीनशी संबंधित १६ फाइल्स गायब झाल्या आहेत. या फाइल्समध्ये एक छायाचित्रही होते, ज्यामध्ये कथितपणे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. वेबसाइटवर अपलोड केल्यानंतर एका दिवसाच्या आतच या फाइल्स हटल्या. याबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही आणि जनतेला कोणतीही अधिकृत माहितीही देण्यात आलेली नाही.

गायब झालेल्या दस्तावेजांमध्ये निर्वस्त्र महिलांच्या चित्रांची छायाचित्रे तसेच एक फोटो होता, ज्यामध्ये ट्रम्प, एपस्टीन, मेलानिया ट्रम्प आणि एपस्टीनची सहकारी घिस्लेन मॅक्सवेल एकत्र दिसत होते. हा फोटो फर्निचर आणि कपाटांमध्ये ठेवलेल्या वस्तूंच्या छायाचित्रांच्या संग्रहाचा भाग होता. या फाइल्स जाणूनबुजून हटवण्यात आल्या का, याबाबत न्याय विभागाने काहीही स्पष्ट केलेले नाही. विभागाकडून सार्वजनिकपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आणि एका प्रवक्त्यानेही प्रश्नांची उत्तरे दिलेली नाहीत.या फाइल्स अचानक गायब झाल्यामुळे सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे—नेमके कोणते दस्तावेज हटवले गेले आणि का?

या घटनेमुळे एपस्टीन आणि त्याच्या संपर्कात असलेल्या प्रभावशाली व्यक्तींविषयी जनतेची उत्सुकता आणखी वाढली आहे.

संसदेच्या निगराणी समितीतील डेमोक्रॅट सदस्यांनी ट्रम्प यांचा फोटो गायब झाल्याबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत प्रश्न उपस्थित केला—“आणखी काय-काय लपवले जात आहे? अमेरिकन जनतेसाठी पारदर्शकता अत्यावश्यक आहे.” या घटनेमुळे न्याय विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या दस्तावेजांबाबत व्यक्त झालेल्या चिंताही पुन्हा वाढल्या आहेत. अलीकडे लागू झालेल्या कायद्याअंतर्गत एपस्टीनशी संबंधित काही दस्तावेज सार्वजनिक करण्यात आले होते; मात्र त्यामध्ये त्याच्या गुन्ह्यांविषयी किंवा त्याला अनेक वर्षे गंभीर आरोपांपासून कसे वाचवण्यात आले, याबाबत फारशी माहिती नव्हती.

सर्वाधिक प्रतीक्षित दस्तावेज—ज्यात एफबीआयकडील पीडितांच्या मुलाखती आणि अभियोजन निर्णयांवरील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत टिपण्णींचा समावेश होता—उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. त्यामुळे त्या काळात एपस्टीनविरुद्धच्या संघीय प्रकरणात कोणते निर्णय का घेण्यात आले आणि कोणत्या आधारावर त्याला किरकोळ गुन्ह्याची कबुली देण्याची परवानगी देण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही.

ब्रिटनचे माजी राजपुत्र अँड्र्यू यांच्यासह अनेक मोठी नावे या प्रकरणात समोर आली असली, तरी त्यांच्याबाबत फारच मर्यादित माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नेमकी कोणाची सखोल चौकशी झाली आणि कोणाची नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नव्या माहितीत काही पूर्वी न पाहिलेले तपशीलही होते—उदाहरणार्थ, १९९६ मधील एक तक्रार ज्यामध्ये एपस्टीनवर मुलांची छायाचित्रे चोरण्याचा आरोप होता, तसेच २००० च्या दशकात न्याय विभागाने संघीय खटल्यातून माघार घेतल्याची बाब. तथापि, बहुतेक सामग्रीमध्ये एपस्टीनच्या न्यूयॉर्क आणि यूएस व्हर्जिन आयलंड्समधील घरांची छायाचित्रे, तसेच काही प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकारण्यांची चित्रे यांचाच समावेश होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande