
वेलिंग्टन, 21 डिसेंबर (हिं.स.)न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी कसोटी क्रिकेटच्या १४८ वर्षांच्या इतिहासात कधीही न पाहिलेली कामगिरी केली आहे. माउंट मौंगानुई येथील बे ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांच्या जोडीने इतिहास रचला. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांची जोडी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावणारी पहिली सलामी जोडी बनली.
कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या १४८ वर्षांत कोणत्याही संघाच्या सलामीवीर जोडीने असा पराक्रम केलेला नाही. डेव्हॉन कॉनवे आणि टॉम लॅथम यांच्या जोडीने सामन्याच्या दोन्ही डावात शतके झळकावून ऐतिहासिक कामगिरी केली.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीरांनी (डेव्हॉन आणि लॅथम) ३२३ धावांची मोठी भागीदारी केली. कर्णधार टॉम लॅथमने १३७ धावा केल्या, तर डेव्हॉन कॉनवेने २२७ धावांची शानदार खेळी केली. त्यानंतर, न्यूझीलंडने त्यांचा पहिला डाव ५७५/८ वर घोषित केला.वेस्ट इंडिजकडून केवम हॉजने शानदार फलंदाजी केली आणि तो १२३ धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ४२० धावांपर्यंत मजल मारली होती.
न्यूझीलंड दुसऱ्यांदा फलंदाजीसाठी आला तेव्हा कॉनवे आणि लॅथमने इतिहासाची पुनरावृत्ती केली. डेव्हॉन कॉनवेने १३९ चेंडूत १०० धावा केल्या आणि टॉम लॅथमने १३० चेंडूत १०१ धावा केल्या. दोघांनी १९२ धावांची सलामी भागीदारी केली. शेवटी, केन विल्यमसन (४०*) आणि रचिन रवींद्र (४६*) यांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने ३०६/२ धावांवर डाव घोषित केला आणि वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ४६२ धावांचे लक्ष्य ठेवले.
विजयासाठी ४६२ धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसअखेर एकही विकेट न गमावता ४३ धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजला सामना जिंकण्यासाठी आणि मालिका १-१ अशी बरोबरी करण्यासाठी शेवटच्या दिवशी ४१९ धावांची आवश्यकता आहे.
वेस्ट इंडिजने आधीच सर्वाधिक धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम केला आहे (४१८ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २००३). यावेळी त्यांना ४६२ धावांची आवश्यकता आहे. जर त्यांनी हा धावांचा पाठलाग साध्य केला तर हा त्यांचा २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) मधील पहिला विजय असणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे