

मुंबई, 21 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय वेअरेबल ब्रँड बोट ने आपल्या व्हॅलर सब-ब्रँड अंतर्गत नवीन स्क्रीन-फ्री स्मार्ट रिंग व्हॅलर रिंग 1 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. ही स्मार्ट रिंग विशेषतः सतत आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगसाठी डिझाइन करण्यात आली असून, ज्यांना स्मार्टवॉचची स्क्रीन वापरणं टाळायचं आहे अशा वापरकर्त्यांसाठी हा एक डिस्क्रीट आणि सोयीस्कर पर्याय आहे. हलक्या पण मजबूत टायटॅनियम फ्रेमपासून बनलेली ही रिंग 6 ग्रॅमपेक्षा कमी वजनाची असून दैनंदिन वापरासाठी टिकाऊ असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
व्हॅलर रिंग 1 मध्ये 24x7 हृदय गती मॉनिटरिंग, हार्ट रेट व्हेरिएबिलिटी (HRV) इनसाइट्स, SpO2 ट्रॅकिंग, त्वचेचे तापमान मॉनिटरिंग, स्ट्रेस ट्रॅकिंग, VO2 मॅक्स एस्टिमेशन आणि स्टेप ट्रॅकिंग यांसारखी प्रगत आरोग्यविषयक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. झोपेच्या ट्रॅकिंगमध्ये झोपेचे विविध टप्पे, झोपेची गुणवत्ता आणि दिवसातील झोपेची ओळख यांचा समावेश आहे. याशिवाय, 40 पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड्स उपलब्ध असून धावणे, सायकलिंग, चालणे, स्ट्रेंथ ट्रेनिंग यांसारख्या विविध फिटनेस अॅक्टिव्हिटीजला सपोर्ट मिळतो.
कंपनीच्या माहितीनुसार, या स्मार्ट रिंगमध्ये अॅडव्हान्स्ड चिपसेट आणि नेक्स्ट-जन सेन्सर्स देण्यात आले असून एका चार्जमध्ये तब्बल 15 दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळतो. यूएसबी टाइप-सी चार्जिंग डॉकद्वारे ही रिंग 90 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होते. तसेच 5 ATM वॉटर रेझिस्टन्स रेटिंग असल्यामुळे पोहणे किंवा आंघोळ करतानाही ती वापरता येते. सर्व आरोग्य आणि फिटनेस डेटा अपडेटेड इंटरफेस असलेल्या boAt Crest अॅपद्वारे पाहता येतो.
बोट व्हॅलर रिंग 1 ची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही स्मार्ट रिंग कार्बन ब्लॅक मॅट फिनिशमध्ये उपलब्ध असून साइज 7 ते 12 पर्यंतचे पर्याय देण्यात आले आहेत. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, boAt ची अधिकृत वेबसाइट आणि निवडक ऑफलाइन स्टोअर्सवर ही रिंग विक्रीसाठी उपलब्ध आहे. योग्य फिटसाठी सायझिंग किट देण्यात येत असून खरेदीसोबत हेल्थ बेनिफिट्स पॅकेजही मिळते. स्मार्टवॉचच्या स्क्रीनशिवाय फिटनेस आणि आरोग्य ट्रॅकिंग देणारी ही स्मार्ट रिंग फिटनेसप्रेमींमध्ये विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule