
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी एथर एनर्जीने ऑटो इन्शुरन्स डिस्ट्रीब्यूशन क्षेत्रात प्रवेश केला आहे. आपल्या वाढत्या ग्राहकवर्गाला वाहन विमा सेवा देण्यासाठी कंपनीने पूर्णतः मालकीची सब्सिडियरी कंपनी सुरू केली आहे. ही नवी कंपनी कॉर्पोरेट एजंट म्हणून काम करणार असून देशभरातील ग्राहकांसाठी विविध विमा कंपन्यांच्या भागीदारीत ऑटो इन्शुरन्स पॉलिसी उपलब्ध करून देण्यावर भर देणार आहे.
बेंगळुरूस्थित एथर एनर्जी सध्या परफॉर्मन्स-केंद्रित 450X आणि कुटुंबांसाठी तयार करण्यात आलेला Ather Rizta असे ई-स्कूटर बाजारात विक्री करत आहे. कंपनीनुसार, ऑटो इन्शुरन्स क्षेत्रातील ही पायरी एथरच्या दीर्घकालीन रणनीतीचा भाग आहे. या रणनीतीअंतर्गत कंपनी आपल्या ईव्ही दुचाकीभोवती एक संपूर्ण, एकात्मिक इकोसिस्टम उभारू इच्छिते, ज्यात वाहने, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व्हिसिंग, अॅक्सेसरीज, इतर इकोसिस्टम प्रॉडक्ट्स आणि आता विमा सेवाही समाविष्ट असतील.
एथर एनर्जीचे चीफ बिझनेस ऑफिसर रवनीत सिंह फोकेला यांनी सांगितले की, विमा हा चांगल्या ओनरशिप अनुभवाचा महत्त्वाचा भाग आहे. विमा वितरण एथर इकोसिस्टमच्या अधिक जवळ आणल्याने प्रक्रिया अधिक सोपी, पारदर्शक आणि ग्राहकांच्या प्रत्यक्ष वाहन वापराशी सुसंगत होईल. भविष्यात यामुळे भागीदारांसोबत मिळून असे ईव्ही-स्पेसिफिक विमा प्रॉडक्ट्स डिझाइन करता येतील, जे पारंपरिक पद्धतींपेक्षा प्रत्यक्ष ईव्ही वापर अधिक चांगल्या प्रकारे दर्शवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कंपनीने सांगितले की, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक विमा भागीदारांसोबत काम करण्याचा मानस आहे. विमा वितरण इन-हाऊस केल्यामुळे ईव्ही-स्पेसिफिक विमा नवकल्पना, सुलभ रिन्यूअल प्रक्रिया आणि भविष्यात अटॅच रेट्समध्ये सुधारणा करणे शक्य होईल. हा प्लॅटफॉर्म मुख्यत्वे विद्यमान ग्राहकांसाठीच असल्याने नवीन ग्राहक जोडण्यासाठी अतिरिक्त खर्च येणार नाही, आणि कमी गुंतवणुकीत सातत्याने वाढणारे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule