
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। ओप्पोची रेनो 15 सिरीज 5G चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये लाँच झाल्यानंतर आता ही सिरीज भारतीय बाजारातही दाखल होणार असल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. ओप्पोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर शेअर केलेल्या टीझरद्वारे भारतातील लाँचची पुष्टी केली असून, “कमिंग सून” असे कॅप्शन देण्यात आले आहे. मात्र, अद्याप नेमकी लाँच तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
या टीझर व्हिडिओमध्ये रेनो 15 सिरीजमधील एका मॉडेलचे निळ्या आणि पांढऱ्या रंगातील व्हेरिएंट दाखवण्यात आले आहेत. निळ्या रंगाच्या फोनला ऑरोरा किंवा नॉर्दर्न लाईट्ससारखा ग्रेडियंट फिनिश देण्यात आला आहे, तर पांढऱ्या रंगाच्या व्हेरिएंटच्या मागील बाजूस रिबनसारखा डिझाइन एलिमेंट दिसतो. याआधीच्या अहवालानुसार हा मॉडेल रेनो 15 प्रो मिनी असण्याची शक्यता असून, तो ग्लेशियर व्हाइट रंगात रिबन-स्टाईल फिनिशसह सादर केला जाऊ शकतो.
या फोनमध्ये कॅमेरा डिझाइनमध्येही बदल करण्यात आला असून, आयफोनच्या प्रो मॉडेल्सप्रमाणे लेन्स प्लेसमेंट देण्यात आली आहे. कॅमेरा आयलंडमध्ये तीन वेगवेगळे लेन्स रिंग्स आणि एलईडी फ्लॅश दिसतो.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात ओप्पो रेनो 15 सिरीजचे एकूण चार स्मार्टफोन लाँच होणार आहेत. यामध्ये रेनो 15, रेनो 15 प्रो, रेनो 15c आणि रेनो 15 प्रो मिनी या मॉडेल्सचा समावेश असेल. ही सगळी मॉडेल्स AI पोर्ट्रेट कॅमेऱ्यासह येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. रेनो 15 प्रो मिनीमध्ये तब्बल 200 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात येण्याची शक्यता आहे.
स्टँडर्ड ओप्पो रेनो 15 मध्ये 120x पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स मिळू शकते आणि त्याची किंमत 50 हजार रुपयांच्या आत असण्याचा अंदाज आहे. रेनो 15c मॉडेलमध्ये 7,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात येऊ शकते आणि हा फोन 40 हजार रुपयांच्या आत लाँच होऊ शकतो. तर रेनो 15 प्रो मॉडेलमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूणच, ओप्पो रेनो 15 सिरीज 5G भारतात अनेक व्हेरिएंट्स आणि दमदार फीचर्ससह दाखल होणार असल्याने, प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule