
नवी दिल्ली, 22 डिसेंबर (हिं.स.)आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी पंजाबने सोमवारी १८ सदस्यीय संघ जाहीर केला. पंजाबने संघात आंतरराष्ट्रीय क्रिेकेटपटू शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश केला आहे. पंजाब आपला पहिला सामना २४ डिसेंबर रोजी जयपूरमध्ये महाराष्ट्राविरुद्ध खेळणार आहे.
भारताचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार शुभमन गिल विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपली योग्यता सिद्ध करण्यास उत्सुक असेल. त्याला अलिकडेच आगामी टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून वगळण्यात आले आहे. खराब फॉर्म आणि फिटनेसच्या समस्यांमुळे गिलला संघातून डच्चू देण्यात आला आहे.
कागदावर, पंजाबचा संघ बराच मजबूत दिसतो. यामध्ये प्रभसिमरन सिंग, नमन धीर, अनमोलप्रीत सिंग, रमणदीप सिंग, संवीर सिंग आणि हरप्रीत ब्रार यांसारखे मोठे फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहेत. गुरनूर ब्रार आणि क्रिश भगत हे देखील जलद गोलंदाजीचे नेतृत्व करतील.
शुभमन गिल, अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग किती सामन्यांसाठी उपलब्ध असतील हे स्पष्ट नाही. कारण भारतीय संघ ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर ते २१ जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहेत.
गेल्या हंगामात पंजाबचा प्रवास क्वार्टरफायनलमध्ये संपला होता. यावेळी, ते त्यांचे सर्व सातही लीग सामने जयपूरमध्ये खेळतील. गेल्या हंगामात अर्शदीप सिंग पंजाबचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
पंजाबच्या गटात महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, गोवा आणि मुंबई यांचा समावेश आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबचा लीग टप्पा ८ जानेवारी रोजी संपत आहे. पंजाबने अद्याप कर्णधाराची घोषणा केलेली नाही, त्यामुळे सामन्यानुसार कर्णधारपदात बदल शक्य आहेत.
पंजाबचा १८ सदस्यीय संघ:
शुभमन गिल, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, प्रभसिमरन सिंग, हरनूर पन्नू, अनमोलप्रीत सिंग, उदय सहारन, नमन धीर, सलील अरोरा, सनवीर सिंग, रमनदीप सिंग, जशनप्रीत सिंग, गुरनूर ब्रार, हरप्रीत ब्रार, रघु शर्मा, क्रिश भगत, गौरव चौधरी, सुखदीप चौधरी.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे