रेडमी नोट 15 5G भारतात 6 जानेवारीला होणार लॉन्च
मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। शाओमीच्या रेडमी ब्रँडचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन रेडमी नोट 15 5G लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. हा स्मार्टफोन 6 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे भारतात सादर केला जाणार असून, त्याची विक्री अ‍ॅमेझॉन आणि शाओमी इंडिया यांच्
Redmi Note 15 5G


मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। शाओमीच्या रेडमी ब्रँडचा नवा मिड-रेंज स्मार्टफोन रेडमी नोट 15 5G लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार आहे. हा स्मार्टफोन 6 जानेवारी 2026 रोजी अधिकृतपणे भारतात सादर केला जाणार असून, त्याची विक्री अ‍ॅमेझॉन आणि शाओमी इंडिया यांच्या ऑनलाइन स्टोअरवरून केली जाईल.

याआधीच अ‍ॅमेझॉनवर या फोनची डेडिकेटेड मायक्रोसाइट लाईव्ह झाली असून, त्यातून फोनच्या अनेक महत्त्वाच्या स्पेसिफिकेशन्सची पुष्टी झाली आहे. तसेच टिप्स्टर अभिषेक यादव यांनी या फोनची भारतातील संभाव्य किंमत आणि रॅम-स्टोरेज व्हेरिएंट्सची माहिती लीक केली आहे.

रेडमी नोट 15 5G मध्ये 6.77 इंचाची कर्व्ड AMOLED डिस्प्ले देण्यात आली असून, ती 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 3200 निट्सपर्यंत असल्याचं सांगितलं जात आहे. या स्क्रीनमध्ये Hydro Touch 2.0 तंत्रज्ञान देण्यात आलं असून, त्यामुळे ओल्या बोटांनीही टच रेस्पॉन्स चांगला मिळतो. याशिवाय TUV ट्रिपल आय केअर सर्टिफिकेशन आणि IP66 डस्ट व वॉटर रेसिस्टन्स रेटिंगही फोनमध्ये देण्यात आली आहे.

परफॉर्मन्ससाठी या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या प्रोसेसरमुळे GPU परफॉर्मन्समध्ये सुमारे 10 टक्के, तर CPU परफॉर्मन्समध्ये 30 टक्क्यांपर्यंत सुधारणा होईल. यासोबतच 48 महिन्यांचा लॅग-फ्री अनुभव मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

कॅमेर्‍याच्या बाबतीत रेडमी नोट 15 5G मध्ये 108 मेगापिक्सेलचा मास्टरपिक्सेल प्रायमरी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हा कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगची सुविधाही देतो. फोनमध्ये 5520mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून, ती 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. सॉफ्टवेअरबाबत सांगायचं झाल्यास, हा स्मार्टफोन HyperOS 2 वर चालणार असून, तो Android आधारित असेल.

किंमतीबाबत बोलायचं झाल्यास, लीक माहितीनुसार भारतात रेडमी नोट 15 5G चा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सुमारे 22,999 रुपयांना मिळू शकतो. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट सुमारे 24,999 रुपयांना लॉन्च होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 6GB रॅमसह अधिक किमतीत उपलब्ध असून, भारतात जास्त रॅम आणि कमी किमतीत तो सादर केला जात आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, ग्लेशियर ब्लू आणि मिस्ट पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध होईल.

एकूणच, डिस्प्ले, कॅमेरा, बॅटरी आणि परफॉर्मन्स या बाबतीत रेडमी नोट 15 5G मिड-रेंज सेगमेंटमध्ये चांगली स्पर्धा निर्माण करेल, अशी अपेक्षा आहे. लॉन्चनंतर या फोनवरील ऑफर्स आणि अधिकृत तपशील समोर येणार असून, रेडमी नोट सिरीजप्रमाणेच हा फोन बजेट आणि मिड-रेंज युजर्सना आकर्षित करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande