

मुंबई, 22 डिसेंबर (हिं.स.)। लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियनसाठीच्या न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अर्थात लॅटिन एन-कॅपने 2025 सालातील आपला नववा आणि अखेरचा क्रॅश टेस्ट अहवाल जाहीर केला असून, त्यामध्ये अपडेटेड सुझुकी बलेनोची चाचणी घेण्यात आली. या क्रॅश टेस्टमध्ये बलेनोला 2-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. याआधी ESC आणि दोन एअरबॅग्स स्टँडर्ड असलेल्या जुन्या वर्जनला केवळ 1-स्टार रेटिंग मिळाली होती. त्यानंतर सुझुकीने कारच्या सेफ्टी इक्विपमेंटमध्ये सुधारणा करत साइड बॉडी आणि साइड कर्टन एअरबॅग्स स्टँडर्ड दिल्या. परिणामी, आता 6 एअरबॅग्स स्टँडर्ड असलेल्या अपडेटेड बलेनोच्या सेफ्टी रिझल्टमध्ये सुधारणा दिसून आली आहे.
मेड-इन-इंडिया मारुती बलेनोने या क्रॅश टेस्टमध्ये एकूण 35 पैकी 31.75 गुण मिळवले असून, प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 79.38 टक्के रेटिंग नोंदवली आहे. बाल प्रवासी सुरक्षेमध्ये कारला 49 पैकी 32.08 गुण मिळाले असून, त्याचे प्रमाण 65.46 टक्के आहे. पादचारी आणि असुरक्षित रस्ते वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्या विभागात बलेनोला 36 पैकी 23.17 गुण मिळाले, जे 48.28 टक्के रेटिंग दर्शवतात. सेफ्टी असिस्ट कॅटेगरीत 25 पैकी 58.14 टक्के गुण मिळाले आहेत. या कारचे मूल्यमापन फ्रंटल इम्पॅक्ट, साइड इम्पॅक्ट, साइड पोल इम्पॅक्ट, व्हिपलॅश, पादचारी सुरक्षा आणि ESC चाचण्यांद्वारे करण्यात आले.
अपडेटेड वर्जनमध्ये साइड बॉडी आणि कर्टन एअरबॅग्समुळे साइड इम्पॅक्टच्या दोन्ही परिस्थितींमध्ये डोक्याच्या सुरक्षेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. साइड क्रॅशमध्ये छातीच्या सुरक्षेचा स्तरही पूर्वीच्या तुलनेत चांगला झाला आहे. फ्रंट इम्पॅक्ट चाचणीत कारची रचना स्थिर राहिली असून, फुटवेल सुरक्षित असल्याचे आढळले. ड्रायव्हर आणि पुढील प्रवाशासाठी संरक्षणाची पातळी सातत्यपूर्ण राहिली. ISOFIX माउंट्सच्या सहाय्याने मागील सीटवर रियर-फेसिंग चाइल्ड सीट बसवण्यात आल्यास बाल सुरक्षाही समाधानकारक राहिली. मात्र, पॅसेंजर एअरबॅग डीॲक्टिव्हेशन स्विच नसल्यामुळे पुढील सीटवर चाइल्ड सीट बसवताना अडचण निर्माण झाली.
अहवालानुसार, पादचारी सुरक्षेच्या बाबतीत फारशी सुधारणा दिसून आली नाही. डोक्याला होणाऱ्या दुखापतींची कामगिरी सरासरी ते मर्यादित होती, तर वरच्या पायाच्या भागासाठी संरक्षण कमकुवत राहिले. एकूणच, अपडेटेड सुझुकी बलेनोने साइड-इम्पॅक्ट सेफ्टीमध्ये स्पष्ट सुधारणा दाखवली असली, तरी ADAS फीचर्स आणि पादचारी सुरक्षेबाबतच्या मर्यादा अजूनही कायम असल्याचे लॅटिन एन-कॅपच्या निकालातून स्पष्ट झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule