रत्नागिरीत २४ ते २६ जानेवारीला आर्ट सर्कल फाउंडेशनचा संगीत महोत्सव
रत्नागिरी, 25 डिसेंबर, (हिं. स.) : येथील आर्ट सर्कल फाउंडेशनचा एकोणिसावा संगीत महोत्सव २४ ते २६ जानेवारी या तीन दिवसांमध्ये साकारत आहे. यंदा महोत्सवात युवा पिढीतील आश्वासक कलाकार आणि तपस्वी बुजुर्ग कलाकार यांची मांदियाळी असणार आहे. यंदा वर्ष पंडि
रत्नागिरीत २४ ते २६ जानेवारीला आर्ट सर्कल फाउंडेशनचा संगीत महोत्सव


रत्नागिरी, 25 डिसेंबर, (हिं. स.) : येथील आर्ट सर्कल फाउंडेशनचा एकोणिसावा संगीत महोत्सव २४ ते २६ जानेवारी या तीन दिवसांमध्ये साकारत आहे. यंदा महोत्सवात युवा पिढीतील आश्वासक कलाकार आणि तपस्वी बुजुर्ग कलाकार यांची मांदियाळी असणार आहे.

यंदा वर्ष पंडित के. जी. गिंडे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. येत्या २६ डिसेंबरपासून जन्मशताब्दी सुरू होत आहे. आग्रा घराण्याचे थोर गायक असलेले संगीत विचारवंत पंडित गिंडे यांचे आयटीसी संगीत रिसर्च अकादमीमध्ये मोलाचे योगदान आहे. गुरु-शिष्य पद्धतीच्या शिक्षणाला त्यांनी शिस्तबद्ध आणि संस्थात्मक रूप दिले. सांस्कृतिक दस्तावेजीकरणामध्ये त्यांनी केलेल्या अनमोल काम केले. त्यांच्या या प्रवासाला आणि शास्त्रीय संगीतातील त्यांच्या योगदानाला आर्ट सर्कल हा महोत्सव अर्पण करणार आहे.

महोत्सवाचा प्रारंभ रत्नागिरीचे दोन गुणी वादक कलाकार पखवाज वादक प्रथमेश तारळकर आणि तबला वादक अथर्व आठल्ये करतील. या दोघांच्या सहवादनाने महोत्सवाची सुरुवात होईल. पहिल्या दिवसाचा समारोप शास्त्रीय गायक ओंकार दादरकर करतील. वारसा हक्काने मिळालेली सुरांची देणगी त्यांनी प्राणपणाने जपली आहे. आजोबा नाटककार विद्याधर गोखले, वडील श्रीकांत दादरकर, आई शुभदा दादरकर, आत्या माणिक वर्मा अशा कलाकार कुटुंबीयांच्या गोतावळ्यात ओंकार यांनी आपली स्वतंत्र प्रतिभा सिद्ध केली आहे. ग्वाल्हेर घराण्याचे गायक ओंकार यांना गुणी कलाकार तबला साथ अथर्व आठल्ये आणि संवादिनी साथ वरद सोहनी करणार आहेत. प्रथमेश, अथर्व आणि वरद या रत्नागिरीच्या तिन्ही कलाकारांनी राष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध करत मान्यवरांची दाद मिळवली आहे. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी या तिन्ही कलाकारांची मंचावरील उपस्थिती हा एक सुवर्णयोग आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचा प्रारंभ वाहाणे भगिनींच्या वाद्यसंगीताने होणार आहे. उज्जैन (मध्य प्रदेश) येथील संगीतज्ञ डॉ. लोकेश वाहाणे यांच्या संस्कृती आणि प्रकृती या दोन कन्यांनी लहान वयात संगीत शिकण्यास सुरुवात केली. एकीने उस्ताद शहीद परवेझ यांच्या मार्गदर्शनाखाली सतार वादनात प्रावीण्य मिळवले तर प्रकृती यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली संतूर वादनात आपले कौशल्य वृद्धिंगत केले. त्यांना पंडित योगेश समसी यांचे शिष्य यशवंत वैष्णव तबला साथ करणार आहेत. या दोघींच्या सादरीकरणानंतर दुसऱ्या दिवसाचा समारोप गायिका श्रुती विश्वकर्मा मराठे करतील. संगीताच्या संपन्न परंपरेतून आलेल्या श्रुती किराणा घराण्याच्या गायिका आहेत. विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांचे अनमोल मार्गदर्शन त्यांना लाभले आहे. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत आणि इतर गीतप्रकार श्रुती अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तितक्याच कलात्मकतेने सादर करतात. यशवंत वैष्णव त्यांना तबला साथ करणार आहेत.

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवसाची सुरुवात जयपूर येथील तरुण शास्त्रीय गायक मोहम्मद अमान खान करणार आहेत. आजोबा उस्ताद अमीर मोहम्मद खान यांच्याकडून मिळालेली घराणेदार गायकी मोहम्मद अमान यांनी प्रवाहित ठेवली आहे. मोहम्मद शोएब तबलासाथ तर पंडित अजय जोगळेकर संवादिनीसाथ करणार आहेत.

महोत्सवाचा समारोप शास्त्रीय संगीतातील अध्वर्यु विदुषी डॉ. अश्विनी भिडे देशपांडे करणार आहेत. जयपूर- अत्रौली- मेवाती आणि पतियाळा घराण्याच्या गायकीच्या प्रभावातून अश्विनीताईंनी स्वतःची गायकी विकसित केली आहे. स्वरांच्या सखोल अभ्यासाप्रमाणे सूक्ष्मजीवशास्त्रात पदव्युत्तर पदवी तर भाभा अणुसंशोधन केंद्रातून जैवरसायनशास्त्रातून पीएचडी मिळवली आहे. अश्विनीताईंना साथ संगत संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर आणि तबला साथ तनय रेगे करणार आहेत.

कंठ संगीत आणि वाद्य संगीत यांनी सजलेला हा महोत्सव दरवर्षीप्रमाणे भव्य स्वरूपात साकारणार आहे. यंदाही संगीत महोत्सवाला रसिकांनी मनसोक्त दाद द्यावी तसेच वार्षिक सभासदत्वालाही प्रतिसाद द्यावा, अशी विनंती आर्ट सर्कलकडून करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande