
जळगाव, 25 डिसेंबर, (हिं.स.) पूर्वीपासून शांतता प्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या चाळीसगाव शहरात आता पोलीसांना गावठी कट्टे सापडू लागले आहेत. पोेलीसांनी रेल्वे स्टेशन परिसरात एकावर गोळीबार केल्या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे व दोन जीवंत काडतुसे मिळून आली. हे कट्टे व काडतुसे हस्तगत करण्यात आली. या दोघांनी ज्यांच्याकडून हे गावठी कट्टे घेतले त्याच्या घरावरही पोलीसांनी छापा टाकला असता घरात 1 गावठी कट्टा व 2 जीवंत राऊंड मिळून आले. दोन घटनात पोलीसांनी 3 गावठी कट्टे (पिस्तुल) व 6 जीवंत राऊंड आणि 4 रिकाम्या पुुंगळ्या असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपींतांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांच्या कारवाईत एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावठी पिस्तुल व जीवंत काडतुसे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने 2026 हे चाळीसगाव शहर सुरक्षित शहर ही संकल्पना राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या संकल्पनेच्या आधारे नागरीकांमध्ये सुरक्षाकामी जनजागृती केली जात आहे. बँका, सराफ बाजार, मुख्य मार्केट, बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात गस्त करून संशयितांवर नजर ठेवली जात आहे.तसेच नागरीकांच्या सहभागातून कॉलनी परिसर व मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत नागरीकांना आव्हान केले जात असून नागरीकांकडून प्रतिसाद मिळत आहे. चाळीसगाव शहर पूर्वीपासून शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते.मात्र मागील काही घटनांमधील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या गुन्हेगारंाना आळा घालण्यासाठी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर रात्रगस्त व पेट्रोलिंग दरम्यान नजर ठेवली जात असून दररोज तपासणी केली जात आहे. या तपासणीच्या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला रेल्वे स्टेशन भागातील गोळीबार प्रकरणी दाखल भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 109,352,351(1),(2),3(5) सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3),135 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी दीपक सुभाष मरसाळे रा. सुवर्णाताई नगर व अतुल गोकूळ कसबे रा. इंदिरा नगर, बस स्थानकमागे, चाळीसगाव यांना पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी व पोकॉ. गोपाल पाटील यांच्या पथकाने शिताफीने सापळा रचून धुळे रोड परिसरातून अटक केली.त्यांना न्यायालयात हजर करून 4 दिवसांची पोलीस कोठडी घेतली व त्यांची चौकशी केली असता त्यांनी आरोपी लक्ष्मण प्रथमेश भामरे रा.स्वामीसमर्थ नगर, नागदरोड चाळीसगाव व आरोपी अमीर शेख शमशोद्दीन शेख रा.नागदरोड, पाण्याच्या टाकीजवळ चाळीसगाव यांच्याकडून वापरलेले गावठी कट्टे घेतल्याचे सांगितले. या माहितीवरून चाळीसगाव शहर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन घराची झडती घेतली असता प्रथमेश भामरे याच्या घरातून 1 गावठी कट्टा व 2 जीवंत राऊंड मिळून आले. त्याचे विरोधात पेाकॉ. मोहन सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,5,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे सदर गुन्ह्यात पोलीसांनी आतापावेतो 3 गावठी कट्टे, 6 जीवंत राऊंड व 4 खाली पुंगळ्या असे हत्यारे जप्त केले आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक योगेश माळी, हवालदार विनोद पाटील, भूपेश वंजारी, प्रवीण जाधव, नितीन वाल्हे, पोकॉ. नरेंद्र चौधरी, राकेश महाजन, विलास पवार, गोपाल पाटील, मपोकॉ. मयुरी शेळके अशांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर