त्र्यंबकेश्वर : पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह एकाला अटक
त्रंबकेश्वर, 25 डिसेंबर (हिं.स.) । त्र्यंबकेश्वर येथे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकताच नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, निकालानंतर असते तशी तणावपूर्ण परिस्थिती असताना गावठी प
त्र्यंबकेश्वर : पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह एकाला अटक


त्रंबकेश्वर, 25 डिसेंबर (हिं.स.) । त्र्यंबकेश्वर येथे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नुकताच नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, निकालानंतर असते तशी तणावपूर्ण परिस्थिती असताना गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा इसम आढळून आल्याने दहशत पसरली आहे.

पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार असे अवैध व्यवसायांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेगलवाडी फाटा येथे रोडवर एक इसम अवैधरीत्या घातक अग्निशस्त्रे बाळगून काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची बातमी मिळाली. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी फाटा येथे सापळा लावून संशयित इसमास शिताफीने ताब्यात घेतले. सदर इसमास विचारपूस केली असता त्याचे नाव देवराम संतू सोनवणे (वय 46 वर्षे, रा. तळेगाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असल्याचे सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) व एक जिवंत काडतूस, एक मोटारसायकल, मोबाइल फोन असा मुद्देमाल मिळून आला. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगताना मिळून आला असून, त्यांच्याविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह मपोकाक 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर व विशेष पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, शांताराम नाठे, हवालदार जालिंदर खराटे, सुशांत मरकड, भाऊ झाडे, शंकर साबळे, सुनील बर्वे तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिक ग्रामीण विभागाचे हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. त्र्यंबक शहरात अवैध पिस्तूल प्रकरणाने दहशत पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande