
जळगाव, 25 डिसेंबर (हिं.स.) विनापरवाना वाळूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने कारवाई करत सुमारे ८ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन डंपर व त्यामधील वाळू ताब्यात घेण्यात आली असून, संबंधित दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वावडदा चौफुली परिसरात करण्यात आली. एलसीबीचे सहायक फौजदार अतुल वंजारी व त्यांच्या पथकाने जळगाव–पाचोरा मार्गावर वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचला. त्यानुसार विनाक्रमांकाचे दोन डंपर अडवून तपासणी करण्यात आली असता, त्यामध्ये विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे उघड झाले. या कारवाईत प्रत्येकी सुमारे चार लाख रुपये किमतीचे दोन डंपर तसेच १६ हजार रुपये किमतीची वाळू जप्त करण्यात आली. डंपरवर क्रमांक प्लेट नसल्या तरी चालकांनी या डंपरचे क्रमांक एमएच-१९ सीएक्स-५९८७ व एमएच-१९ सीएक्स-२८९८ असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी शेखर वासुदेव सोनवणे (वय २४, रा. कानसवाडा, ता. जळगाव) व महेश प्रकाश नाईक (वय २९, रा. खडकी, ता. जामनेर) या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. विनापरवाना वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर