
रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे आयोजित चिपळूण सायक्लॉथॉन उत्साहात पार पडली. त्यामध्ये ६ ते ६० वयोगटातील १२५ जणांनी सहभाग घेतला.
चिपळूण पंचक्रोशीतील लहान-थोरांमध्ये सायकलिंग या आरोग्यदायी व्यायाम प्रकाराची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. यंदाही चिपळूणकरांनी या सायक्लॉथॉनला भरघोस प्रतिसाद दिला.
शिवराज ढाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पेढांबे ब्रिज, डी स्टार वॉटर पार्क येथे फिरून परत त्याच मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असा सुमारे १८ किलोमीटरचा सायक्लोथॉनचा मार्ग होता. दीड तासात ही राइड अत्यंत उत्साहात पार पडली. ही सायक्लॉथॉन सर्व वयोगटांसाठी खुली होती. सलग पाचव्या वर्षी सहभागी रायडर्सच्या संख्येत वाढ होत असल्याची परंपरा यंदाही कायम राहिली. विशेष म्हणजे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. अनेक विद्यार्थ्यांनी सिंगल गिअर एमटीबी सायकलवर ही राइड यशस्वीरीत्या पूर्ण केली.
महिलांचा सहभागही उल्लेखनीय ठरला. त्याचबरोबर परिसरातील व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, लोटे औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या आयोजनात चिपळूण लिओ क्लबने सायकलिंग क्लबसोबत रूट सपोर्टर म्हणून मोलाची भूमिका बजावली. उपक्रमाच्या सुरक्षित आणि शिस्तबद्ध यशस्वीतेसाठी चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट नियोजन केले, तर लिओ क्लबच्या सदस्यांनी रस्त्यावरील वाहतूक नियंत्रणात महत्त्वाची साथ दिली.
प्रत्येक फिनिशर रायडरला चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन गौरविण्यात आले. या अनुभवाबद्दल अनेक सहभागी रायडर्सनी समाधान व्यक्त करत क्लबचे आभार मानले व भविष्यातील उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची इच्छा दर्शवली.
सर्व सहभागी रायडर्सकडून मिळालेल्या उत्साही आणि आनंदी प्रतिक्रियांमुळे चिपळूण व परिसरात सायकलिंग संस्कृती अधिक वाढवण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना चिपळूण सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी