
जळगाव, 27 डिसेंबर (हिं.स.) शहरात जळगाव रनर्स ग्रुपतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘खान्देश रन (मॅरेथॉन)’ चे आयोजन करण्यात आले असून ही भव्य धावस्पर्धा रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सागर पार्क मैदान येथे पार पडणार आहे. यंदा या मॅरेथॉनसाठी तब्बल ३००० धावपटूंनी ऑनलाइन नोंदणी केली असून जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. समाजामध्ये व्यायाम, आरोग्य आणि फिटनेसविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने जळगाव रनर्स ग्रुप गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. खान्देश रनमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या पाच वर्षांत अनेक नागरिकांना सकाळी लवकर उठून नियमित व्यायाम करण्याची सवय लागली आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट धावपटू घडले असून त्यांनी जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे १५ ते २० धावपटूंनी ‘आयर्नमॅन’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची कामगिरी करत परदेशातही जळगावचे नाव उज्वल केले आहे. खान्देश रन २०२५ च्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला एक्सपो खान्देश सेंट्रल मॉल, जळगाव येथे उत्साहात पार पडला. या एक्सपोमध्ये सर्व नोंदणीकृत धावपटूंना स्पर्धेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी धावपटूंना ड्राय-फिट टी-शर्ट, बिब नंबर तसेच गुडी बॅगचे वितरण करण्यात आले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व धावपटूंनी स्वतः उपस्थित राहून आवश्यक साहित्य स्वीकारले.
रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता सागर पार्क येथून खान्देश रनला सुरुवात होणार आहे. ही मॅरेथॉन चार गटांमध्ये पार पडणार असून त्यामध्ये २१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी टाइम रन, ५ किमी स्टॅमिना रन आणि ३ किमी फन रन यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर