
रत्नागिरी, 28 डिसेंबर, (हिं. स.) : संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या वतीने ‘रन फॉर एज्युकेशन’ या संगमेश्वर तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता आयोजित होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी आणि शिक्षणाचा संदेश पोहोचावा, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. स्पर्धा लहान गट (१६ वर्षांखालील - इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतचे विद्यार्थी) आणि खुला गट सर्व वयोगटातील धावपटूंसाठी अशा दोन गटांत होणार आहे. दोन्ही गटांत मुले आणि मुलींसाठी स्वतंत्र स्पर्धा आणि बक्षिसे असतील.
स्पर्धेची सुरुवात आणि सांगता लोवले (संगमेश्वर) येथे नवनिर्माण महाविद्यालयात होईल. लहान गटासाठी मयूरबाग ते नवनिर्माण महाविद्यालयपर्यंत आणि खुल्या गटासाठी बुरंबी ते नवनिर्माण महाविद्यालयापर्यंत धावण्याचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.
विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यांचा तपशील असा -
खुला गट : प्रथम क्रमांक ३,०००, द्वितीय २,००० आणि तृतीय १,०००, उत्तेजनार्थ ५०० रुपये. लहान गट : प्रथम क्रमांक २,५००, द्वितीय १,५०० आणि तृतीय १,०००, उत्तेजनार्थ ५०० रुपये. याशिवाय उत्तेजनार्थ बक्षिसे आणि सर्व सहभागींना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.
प्रवेश अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख ८ जानेवारी २०२६ आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शाळेचे/महाविद्यालयाचे तसेच मोठ्या गटासाठी ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. स्पर्धा फक्त संगमेश्वर तालुक्यापुरती मर्यादित असल्याने तालुक्याबाहेरील स्पर्धकांना प्रवेश दिला जाणार नाही.
इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी प्रा. दीपक भोसले (९८६०१५२१२२), प्रा. प्रशांत जाधव (९९७५०९५३०३), प्रशांत खेडेकर (९८२३४१९९५०), सिद्धेश सावंत (९७६३०९७६४०) किंवा नवनिर्माण महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी